Monday, April 25, 2022

 कुठे गेल्या या टॉपर मुली ? 

            

              माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामाच्या ठिकाणचे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने ती बदली होत नाही तोवर माहेरीच राहून कामाच्या ठिकाणी येत असे. नोकरीचे गाव माहेरापासून जवळ होते. मैत्रीण शनिवारी दुपारी सासरी जायची आणि सोमवारी तशीच कामावर यायची. फार व्यक्त होण्याचा स्वभावच नसल्याने अगदी सुरुवातीलाच सोमवारी आली कि मंगळवार पासून तीच रडणं चालू असायचं. जवळपास आम्हाला दोन एक महिने लागले हे कळायला कि ती सासरी गेल्यावर तिथली कामवाली बाई बंद केलेली असायची आणि दोन दिवस एवढ्या मोठ्या खटल्याची धुणीभांडी करून तिचे हात सुजलेले असावयाचे आणि प्रचंड वेदना व्हायच्या. बरं ती शहरात वाढलेली नोकरी करणारी मुलगी अवाक्षर हि न काढता हे सारं करत राहिली. शिवाय कामाच्या ठिकाणी जायला दहा वर्षांपूर्वी साधन नसल्याने किमान चार किलोमीटर अंतर चालत जावे यावे लागे. म्हणजे सोमवारी सासरहून आल्यानंतर रोजची पायपीट चुकणारी नव्हती. त्यात सासरी कसलीही कमी नाही. भला मोठा बंगलो, वॊशिंग मशीनसह सर्व सोयी सुविधांनी युक्त घर शिवाय लग्नात तिला कोणत्याही वस्तूची कमी राहू दिली नव्हती आई वडिलांनी. एवढं सर्व असताना तिची परीक्षा घेण्याची हि कोणती विकृत मानसिकता? विशेष म्हणजे तिला upsc परीक्षा interview चे पत्र आलेले असतानांही तिला तू हे करू शकत नाहीस असं म्हणून जाऊ दिले नाही. ती लग्नापूर्वी पासून परीक्षेचा अभ्यास करत होती. लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच तिला हे पत्र मिळाले होते. 

                       यानंतर ती जेव्हाही भेटली तेव्हा फक्त रडते. संसार नवरा मुलं सासू- सासरे , नणंदा -भाचे सगळा परिवार सुखात आहे. नवऱ्याचे अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तरीही फक्त रडते कारण तिचे पंख किती सुरेख आणि बळकट होते याचे साक्षीदार होते मी आणि ते छाटले जाण्याच्या दुर्दैवी क्षणांचीहि साक्षीदार होते मी. 

                       गेल्या आठवड्या पासून कुठे गेल्या या टॉपर मुली च्या शीर्षकाने फिरणारा मॅसेज वाचला आणि असे असंख्य प्रसंग समोर उभे राहिले. सोबत काम करणाऱ्या पाच आकडी किंवा अगदी ऐंशी हजारापर्यंत पगार घेणाऱ्या महिलांच्या समस्यां ह्याच स्वरूपाच्या आहेत. त्यांना कामाहून घरी आल्यानंतर कामात थोडी मदत मिळावी म्हणून कामाला बाई लावण्याची परवानगी हवी आहे किंवा मग मुलांचा अभ्यास तरी घरातल्या कुण्या व्यक्तीने घ्यावा असे तिला वाटते किंवा मग माझ्या मासिक पाळीच्या काळातील वेदना जास्त असतात त्या नाही सर्वांसमोर सांगता येत नाही म्हणून तरी नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात आणि कामात हातभार लावावा. शारीरिक आणि मानसिक आंदोलनांच्या काळात घरातल्या आपल्या माणसांनी समजून घ्यावे हि प्रत्येक स्त्रीची किमान अपेक्षा असते. तशी ती करण्यात काही गैरही नाही मात्र त्या पूर्ण न झाल्यास अनेकदा वादाला तोंड फुटते आणि मग तिला तिच्या नोकरीचा आणि पगाराचा घमंड आहे असा सरळ सरळ अर्थ काढला जातो. या जात्यात अडकलेल्या असंख्य स्त्रिया नंतर स्वतःला यातच अडकून घेण्याची सवय लावून घेतात काही प्रचंड भरडल्या जातात तर काही लवकरच यातून बाहेर पडून आपले आयुष्य जगू लागतात. अर्थात यातल्या कुठलीही टप्प्यावरच्या स्त्रीला जगणे सोपे नाहीच कारण तितक्या उदार आणि विशाल दृष्टीकोनाची अजूनतरी आपली सामाजिक परिस्थिती नाही हे मान्य करायला हवे आहे. 

                   एका कवीने लिहून ठेवले आहे, 

                All women in the world, 

                speaks same language of silence.

 किंवा मग 

              'नाही पुसत ग कोणी रंग रुपला आपुल्या 

              दाणं पाखडून द्याया नुसत्या आपण सुपल्या '

किंवा मग 

            ' कानातल्या कुडकांना, आला अहेवाचा मान 

              गुंजभर सोन्यासाठी, बाई जल्माची गहाण 

              हातीपायी बेड्या तिच्या, नाकी कानी टोचतात 

              संसाराचे रखवाले, जीवावर उठतात 

             तिच्या जलमाची नोंद नाही कुठं दप्तरात 

             तिच्या मरणाची वर्दी नाही कुण्या कचेरीत '


                 यांसारख्या बाईपणाचे अस्तर उलगडून मांडणाऱ्या कवींना माझा सलामच आहे मात्र परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे हे आपल्या सामाजिक उत्थानाचं खूप मोठं अपयश आहे. 

            स्त्रीच्या नव्या सामाजिक दर्जानुसार पुरुषाच्या  दृष्टिकोनात फरक पडलेला असला तरी स्त्रीला सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यात वेगवेगळे मुखवटे घेऊन वावरावे लागते तसं पुरुषाचं नसत. कारण स्त्री घराबाहेर जेवढी यशस्वी होईल तितके तिला कुटुंबात नम्र वागावे लागते. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तिला सामाजिक सिद्धतेसाठीच्या संघर्षात तिचे स्त्रीसुलभ गुणविशेष सांभाळणे  या कसरतीत तिचा विलक्षण गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया परंपरागत भूमिकेकडे वळत आहेत. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत्व फुलावण्यापेक्षा परंपरागत भूमिकांत अडकणे जास्त सुखकर आणि सोपे आहे. पण काळाचे चाक उलटे फिरवता येत नाही. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने परिस्थितीतील बदल मोकळया मानाने स्वीकारणे हेच श्रेयस्कर नाही काय ? अशाने स्त्रीला संपूर्ण माणूस म्हणून दर्जा निश्चित प्राप्त होईल. मग या टॉपर मुली निश्चितच हरवणार नाहीत.  

              

                                         - आरती बोराडे

                                 प्राथमिक शिक्षक , इगतपुरी

Sunday, February 9, 2020


मी तुझं काय करू रे .....
आणि क्षणात म्हणतोस, ' ब्लॉक कर'

 पावसाला जमलंय स्वतःला ब्लॉक करणं ?? 
की, जमिनीला अंकुरण्यापासून स्वतःला...?
त्यांना जमलं तर मलाही जमेल...
मी त्याच पावसात 
मातीतून रूजून आलेय !

'तुला थांबवण अवघडे' , 
असंही कितीदा म्हणालास तू .....
हे म्हणजे असं झालं
पावसानं बेभान कोसळावं 
आणि धरती हिरवी होऊ लागली की, 
म्हणावं ; 'तुझं अंकुरणं थांबवणं अवघडे !'

तुला माहीतीय ?
आपण स्पर्शातून थेट
आपल्या माणसाच्या रक्तातून वाहतोय
ही फिलींग जगण्याची प्रचंड उर्जा देते.
स्पर्शातून इतकंच कळलं मला !

रक्तातून तू धावतोस शरीरभर
तेव्हा पेशी न् पेशी रोमांचीत होते.
तुझी  सोबत प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष
कुठलीही असली तरी सोबतीची जादूगरी
तुला साधलीय इतकं निश्चित !
हजारो वर्ष जगण्याची भावना तुझ्या स्पर्शातून येते !

काय करू मी तुझं !

पोटात बाळ असण्याचे क्षण सर्वोत्तम असतात
 मला तुला असंच घ्यावं वाटतंय !

तुझ्यावर प्रेम असण्यासाठी
कोणतंच कारण लागत नाही.
तू समोर असावास इतकंच !

तुझा सुगंध श्वास भरून उरात साठवून घ्यावा !
पण सारंच इतक्या कमी वेळेत नाही सांगता येत.

ऐहिक , भौतिक गोष्टींनी आपला भवताल गजबजलेला असतो आणि आत तुझ्या माझ्या अद्वैताचा वावर पिंगा घालतो !
तो पिंगा , तो अस्वस्थ वावर समोर व्यक्त करता येत नाही
म्हणून तुला विचारलं होतं
तुला डोळ्यांची भाषा कळते का ....
आणि स्पर्शाचीही ?

तुला माहीतीय ....
तुझे डोळे किती सुंदर आहेत... ते मला फार आवडतात.
शांतपणे संततधार कोसळणाऱ्या पावसासारखे ! 

आणि मी त्याने तयार होणाऱ्या बेभान ओढयासारखी...

डोळे मिटले तर आजही मी
पावसाची ओढाळ रिमझीम ,
पानांवरून टपटपणारे थेंब ,
खळाळ्णारे धबधबे आणि
आपलाच आपल्याशी होणारा
शांततेचा संवाद निश्चल अनुभवते.

आणि या साऱ्यात सोबतीला तू असतोस

देहाशिवायचं आत्मरूप
पावसात एकटयाने जायचे त्यावेळी अनुभवलंय मी !
माणसाच्या स्पर्शविरहीत निसर्गाच्या सान्निध्यात
चिरंतन सुख असतं.
हे निरपेक्ष सुख काळजात नांदतं तिथं बुध्दत्व उगवून येतं !
तू माझ्यातलं बुध्दत्व होऊन आला आहेस !

-आरती

Wednesday, January 23, 2019





















फोटो क्रेडीट : गुगल


माझा प्रियकर सावळा आहे कि
'सावळा ' हाच माझा प्रियकर आहे ? 
 का तू इतका ओळखीचा ?
तुझ्या सोबत असंख्य रात्रींनी चांदणं माळली
वारा अवखळ येत- जात राहिला 
वर्षानुवर्ष माझ्या श्वासांत तुझ्या रूपानं 

ते काहीही असेल
पण ' सावळ्याशी 'असलेलं नातं मात्र 
विश्वात्मक आहे !


मी  त्याला म्हटलेही कितीदा 
तु वाळवंटात गवसलेलं रान आहेस
लाटेची हातात आलेली गाज आहेस
वेळूच्या बनातली साद आहेस
कृष्ण रातीचा चांद आहेस

तुझ्या पाऊलखुणांच्या मातीत उगवणारी 
हिरवी स्वप्नं भेटत राहिली जन्मोजन्मी
तु हवा तसा हवा तिथे सापडतोस मला 
कारण
तुझ्या गालावर माझ्या बोटांनी 
रेखाटली निळाईनक्षी
राधेच्या झुळूकेलाही कृष्णसाक्षी
तुझ्या गळ्याभोवती माझ्या मोगऱ्याचा चाळा
सांजवेळी पक्षांच्या मोहनमाळा

यमुने काठचा वारा गुणगुणला
प्रिये,आठवणीने आनंदी व्हायचं बरं 
नाही कधी व्यथित व्हायचं
तेव्हाच ,
अठ्ठावीस युगे निःशब्दपणे तू सांगत राहिलास , 
'सखे ,तुझ्या पाठीवर अंधऱ्या रात्री 
बोटाने जादूई शब्द कोरायचे  .. 
अन तुला ओळखायला लावायचे आहेत .... '

तू आहेस स्थितप्रज्ञ
मी मात्र वादळवेदना ! 

तरिही वाट बघणं नकोच 
नकोच तो जीवघेणा काळ

सतत सोबतीने जगावं 
इच्छा नाहीच काही गैर 
कसं म्हणावं इच्छेला इच्छा तरी ?
आतला आवाज कि आंतरिक गरज ?
माहीत नाही !
अखेर त्या रात्री भेटलो आपण
तेव्हा ,
तुझ्या ओठांतून येणारं प्रत्येक अक्षर 
मी पिऊन टाकलं घटाघटा
तुझ्या बासरीच्या उबदार श्वासस्पर्शाने 
रोमांचाची शिरशिरी उठली रक्तातल्या अणूरेणूत

सांग ना रे ,
उदया सकाळच्या किरणांवर 
आता कोणता वर्तमान लिहू ?

तू आहेस रक्तात कृष्णा ! 
                
                 -आरती

Friday, November 30, 2018

आम्ही असेच आहोत !

-आरती बोराडे         

स्वतःची स्पेस निर्माण करून बंडखोरी करत, लिबरल जगणाऱ्या स्त्रियांनी मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा प्रवास अतिशय खडतर पणे केलेला असतो.याची यत्किंचितही कल्पना नसलेल्या, जबाबदारीने मिळवलेल्या व फुलवलेल्या स्वातंत्र्याची चव काय असते हे न चाखलेल्या असंख्य स्त्रिया अवतीभवती असतात.अशा स्त्रियांचा जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्रास होऊ लागतो तेव्हा अशा शिकलेल्या नोकरदार असूनही मूर्ख आणि मेंदूने बेरोजगार असलेल्या स्त्रियांपासून दूरच राहिलेले बरे ! 
        कुठल्याही प्रकारचा सोशल सेन्स न पाळता, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फरक न करता उंडारणारे जेव्हा शहाणपण शिकवू लागतात तेव्हा किव येऊ लागते मग त्यांच्या शिक्षणाची ! असे नमुने एखाद-दुसरे असले तरी त्यांचा त्रास इतर स्वतंत्र स्त्रियांना सर्वतोपरी त्या देत असतात किंवा तो त्रास होतोच. त्यामुळे साऱ्याचं स्त्रियांना त्या कॅटेगिरीत मोजले जाऊ लागते. 
        आमचे स्वातंत्र्य हे जगाला दाखवत सुटण्याची गोष्ट नाही हे तमाम स्त्री पुरुषांनी लक्षात ठेवावे. तो आमच्या जगण्याचा भाग आहे ,ते जीवनाच तत्त्व आहे त्याचमुळे I'm free but not available...हे आमच्या रक्तात भिनलंय, हे माहीत नसणारे कधीही उठून आम्हाला फोन करून स्वतःची भडास काढत असतील तर आम्ही शांततेने ते ऐकून घेतो.मात्र संधी मिळाली की समूळ नायनाट करू शकतो इतकी ताकद आम्ही आमच्या शांततेतून कमावलेली असते.
          नोकरीला असणे, हातात पैसा असणे म्हणजे यांचे विश्व विस्तारलेले असतेच असे नाही. पेहरावातून तुम्ही तुमचे स्वातंत्र्य दाखवू शकत असालही तरी पोशाख ही 'काही' 'शो' करण्याची गोष्ट नाहीये, त्यातून तुम्ही फार लिबरल वगैरे दाखवू शकत असला तरी त्यातून तुमच्या मनाची कुरूपता तुम्ही लपवू शकत नाही हेही निश्चितच ! 
         एकवेळ पुरुषांशी वैर, तुलना, स्पर्धा परवडली पण असल्या मेंदूने दरिद्री स्त्रियांपासून दूर राहिलेलेच बरे ! आमचे शील,अस्तित्व आम्हाला जपता येते.आमचे मित्र-मैत्रिणी,आमचे सहकारी, आप्त या साऱ्या नातेसंबंधांचा बॅलन्स आम्हाला करता येतो.त्यात गफलत आम्ही करत नाही.याचा अनेक पुरुष असल्या मूर्ख बायकांच्या बिनडोक कृतींमुळे आमच्याबाबत गैरसमज करून 'अवेलेबल' गटातल्या समजू लागले तर त्यांना वेळीच डोस देणेही गरजेचे ठरू लागते.
           अशा अर्धवट स्त्रियांसारखेच काही निर्ढावलेले मूर्ख पुरुषही असतात अवतीभवती.त्यांना तर बायकांच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्यात फार इंटरेस्ट असतो.पण ते काही लपून राहत नाहीच.योग्य वेळ येताच अशांनाही जरब बसवणे मग आमचे इतीकर्तव्य बनते ! ते होतेच होते वेळ आल्यावर ! 
         त्यामुळे सावध आमच्यापासून ! आमच्याकडे आम्ही जबाबदारीने मिळवलेल्या अस्तित्व आणि शांततेची ताकद फार मोठी आहे. 
         आमच्या कामात चुका होतील तर त्या दुरुस्त करू, आमचे संबंध कुणाशी बिघडत असतील तर ती सुधारण्याचा प्रयत्न करू मात्र अस्तित्वाचा आणि हक्काचा प्रश्न असेल तर समोरच्यांना निक्षून सांगते आमच्याकडे कटाक्षही टाकू नका आणि  त्रास देण्याचा प्रयत्नही करू नका ! 
 - आरती बोराडे

Thursday, October 4, 2018

स्वतःला आतून घासून-पुसून स्वच्छ ,लख्ख नाही का करता येणार कधी ?



 फोटो क्रेडीट : गुगल





















किती माणसं आपल्या अवतीभवती असतात.आई-वडील, नातेवाईक , बहिण- भाऊ ,चुलत, मावस, सख्खे ,दूरचे ,मित्र- मैत्रिणी, सहकारी इतक्या हक्कांच्या माणसांमध्ये असून सुद्धा आपण एकटे का असतो? किंवा सतत तणावाखाली का असतो? कामाचा ताण खूपच जास्त वाढला आहे असं सतत वाटत राहतं ! मग या सगळ्या जगण्यामधून जी काही नाती आहेत त्या नात्यांकडे जर बघितलं तर ही नाती फक्त गरजेपुरती आहेत असं वाटत राहत. 

खरंतर आता हातात असलेल्या मोबाईलने नात्यांची वाट अगदी सोपी करून दिली आहे. कितीतरी लोकांचे स्टेटस आपण रोज नियमितपणे पाहत असतो ! पण कधीतरी या रोज आवडणाऱ्या कितीतरी जणांच्या भावनांबद्दल आपण खुलेपणाने बोलत नाही. भरभरून कौतुक करत नाही.असं का ? आपलं मन नात्यांमधली सोपी झालेली वाटही का चोखाळत नाही ? 

समजा, एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीने आपलं काम केले नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थितीने जर आपल्या कामाचा बोजवारा उडाला तर आपण किती अस्वस्थ होतो ,प्रचंड तणावाखाली जातो,अनेक कामांचा निपटारा राहून गेला अशा अविर्भावात आपला अख्खा दिवस जातो आणि मग अशा सततच्या तणावाचा  निचरा होण्याच्या हक्काच्या जागा लागलीच  आपण शोधतो. मग या हक्काच्या जागा सुद्धा गरजेपुरत्याच आहेत असं नाही का वाटत ?  कालपासून मैत्रिणीचे शब्द कानामध्ये घुमत आहेत. ती म्हणत होती, बघ ना या गरजेपुरत्या ठरलेल्या नात्यांच्या पलीकडे पण काही सापडतय का ? आपल्याच आत आपण स्वतःला आणि इतरांना कुठे ठेवलंय हा शोध घ्यायला हवा आहे.

कधी कधी उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसोबतच एखादया व्यक्तीच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा हृदयाला अलगद स्पर्शून जाते आणि ती व्यक्ती सतत आठवत राहते. 

रोज सोबत असणारी आई ! 'आपल्यासाठी राबणारी आई' ,अशी भावना हि केवळ ती कधीतरी घरी नसली की तिच्या पश्चातच येणारी भावना आहे. 

किंवा कधी काळची काळजात असलेली एखादी व्यक्ती जी आजिबातच संपर्कात नाहीए. काय करते ? कुठे राहते हे देखिल माहित नाही तरिही तिच्या नुसत्याच आठवणीनेही आपण आनंदित होतो.

किंवा कधीही न भेटलेल्या सोशल मिडीयावरील मित्रमैत्रीणींचं उर्जादायी लिखाण , प्रेरणादायी काम पाहून आपणही सुखावतो. स्वतःच्या जगण्याशी हे सारे संदर्भ जोडू पाहतो.  तेव्हा कुठलीही नाती नसलेली माणसे माणूसपणाच्या भावनेतून आपल्याला जवळची वाटू लागतात. 

हे काय आहे ? हेच तर आहे नात्यापलिकडचं स्वतःला खरवडून पाहिलेलं आपलेपण ! कधी काळी कुलुपबंद करून टाकलेल्या नात्यांच्या कठीण कवचाखालीही भावनांचे मृदु तरंग नक्कीच सापडतील ! पण त्यासाठी स्वतःला आतून घासून- पुसून , खरवडून काढायला लागतं, त्याशिवाय मनाचं लख्ख होणं स्वतःला किती उजळून टाकणारं आहे हे कळणार नाही.

 पाण्याचे असंख्य बुडबुडे हवेने फुटावेत त्याप्रकारे नात्यातल्या बॅरियर्सचे बुडबुडे अलगद फुटून मन स्वच्छ , नितळ होऊ लागतं. सगळ्याच नात्यांत स्पष्टता येऊ लागते आणि  एखादया झऱ्यासारखं मन आनंदाने खळाळत जगणं जगू लागते. अर्थात , या प्रक्रियेत समोरच्या व्यक्तीशी आपण कनेक्टेड असू किंवा नसू हा भाग अलाहिदा ! स्वतःशी मात्र पूर्ण कनेक्टेड असतो.

हेच निकोप मन आपल्या हातून अधिकाधिक यशस्वी जीवन  घडवित राहते.



-आरती बोराडे

Sunday, September 23, 2018

गर्भारकविता















खिडकीतून डोकावणारं आकाश 
कवेत घेण्याची स्वप्नं 
रोजच पहावीत
निश्चल समाधीस्त निवांतपणा
तुझीच साधना ती ! 

अंधाऱ्या खोलीच्या आत उजेडायला
एक झरोका पुरेसा 
तू तर अख्खा सूर्य होऊन येतो
प्रचंड प्रखरतेत कवितेच्या कवचकुंडलांना 
उजळून टाकणारा 
तरिही आयुष्याच्या निम्म्या काळासाठी
गुडूप होणारा ! 
त्या रात्रींची चाहूल 
नकोसं करते रोजच ! 
तशी कविता प्रसवत नाही 
रोज रात्री ! 

एकटेपणाच स्वातंत्र्य मुक्तपणे
उधळण्याची संधीही तूच देतोस

डोळ्यांची पिसेदार पंख 
आभाळभर फिरून येतात
तेव्हा खिडकीच होते 
किलकिलत उघडणारे दार 

येत जा गडगडाटासह
असा गर्द होऊन
ओटीत घेईन सारी सळसळ
गर्भारकविता होऊन ! 
     
            -आरती 

Saturday, September 15, 2018

साहचर्य


फोटो क्रेडीट : गुगल



आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर प्रत्येकाच्या वाट्याला असंख्य परीक्षा पाहणारे ,अपेक्षाभंगाचे प्रसंग येतात त्या वेळी अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यातले असंख्य निर्णय चुकतात ,प्रयोग फसतात आणि मग असे अनुभव आले की काही काळ निराशा आल्याची भावना, मानसिक थकलेपण आपल्याला येऊ लागते. तरीही या सर्वातून बाहेर पडताना आपली आपल्याला ओळख पटत असते हा स्वानुभव आहे.अशा अनुभवातुनच आपण घडणार आहोत असं स्वतःच्या मनाला समजावणं आणि स्विकारणंही तितकंच आवश्यक ! 

स्वतः निर्णय घेत जगतांना काही जण थोडे बहुत दुखावलेही जातात मात्र आपण फार काही गमावत नाही हेही आपल्याला कालांतराने समजू लागतं !  थोडक्यात काय तर आपण आधी स्वतःसोबत जगायला शिकलं पाहिजे. यामुळे स्वतःची निर्णय क्षमता तर वाढतेच शिवाय स्वतःचा स्वीकार, दुसऱ्यांना अधिक खोल जाऊन समजावून घेऊन, स्वबळावर जगण्याच्या आणि जगणं सुंदर होण्याच्या अनेक शक्यता आपल्याला दिसू लागतात. यातूनच आत्मचिंतनाची आणि आत्मपरीक्षणाची सवय आपल्या मनाला आणि मेंदूला होते. 

आपण जन्माला आल्यापासून एकाच शाश्वत आणि चिरंतन सत्य आपल्याला सोबत करत असते. ते म्हणजे 'स्वतः ची सोबत'... थोडक्यात काय तर ....
मै जिंदगीका साथ निभाता चला गया ...

खरं तर हा प्रवास म्हणावा तितका सोपा ही नाही आणि अवघड ही नाही !  सतत प्रयोग करत राहण्याची हिंमत असेल, आपल्याला स्वतःला काय हवं आहे ही भूमिका ठाम असेल आणि स्वतःमध्ये बदल करण्याची जर आपली तयारी ,उत्साह असेल तर आपलं आयुष्य अनेक वाटांनी बहरु शकतं. मग अमुक एका घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होत नाही. किंवा तो निर्णय तात्कालिक परिस्थिती पुरताच चुकीचा ठरतो ! 

तसं म्हटलं तर ,आपण कोण कुठली सगळी बंधनं तोडून जगत असतो ? कितीतरी तडजोडी आपण जगताना करतच असतो की ! पण त्या तडजोडी मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजे तर त्यातआनंद असतो आणि मग ती स्वातंत्र्याच्या परिभाषेत मोडतात. रसरशीतपणे, उत्साहाने जगत असताना कामात बुडून जाऊन त्यातली वेगवेगळी आव्हाने पेलतांना आनंद इतका मोठा असतो हे कळायला लागल्यानंतरच निर्भयता आणि आत्मगौरव प्राप्त होतो ! आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा ताकद लागते असे म्हणतात आणि ही ताकद आपल्याला या स्वतःच्या साहचर्यातूनच येते !
                                    
                                                               - आरती बोराडे

Friday, September 14, 2018

मन का विश्वास कमजोर हो ना !


 फोटो क्रेडीट : गुगल




मनावर प्रचंड ताण वाढत चाललाय .... 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' 
असं गेल्या कित्येक महिन्यांपासून चालू आहे. किती दिवसांपासून एक वर्ग खोली मिळत नाहीए ! किमान भाड्याची रूम सुद्धा मिळू नये गावात ?  प्रचंड स्ट्रेस वाढत चाललाय असं वाटत असतानाच अचानक कोणीतरी 75 वर्षाचे वयोवृद्ध शाळे जवळ घेऊन विचारतात , "बाई तुला काही अडचण आहे का ? " मी आश्चर्याने विचारते, "तुम्हाला कोणी पाठवलं का ? किंवा " तुम्हाला असं काही कळलं का की मला रुम हवी आहे ?" ,तेव्हा .. "नाही,मी नाशिकला असतो कधीतरी इकडे येतो.माझ्या दोन तीन रूम खाली आहेत आणि जरा इकडे चक्कर मारला तर अस दिसल की एकाच वर्गात शाळा आहे !  अशी कशी शाळा असेल ना ? " ,अर्थात ते बाबा म्हणजे खूप मोठा आशेचा किरण होते. त्यानंतर दुसरी रूम मिळाली हे हेही ठीकच झालं . पण दिवसभराचा किंबहुना गेल्या चार महिन्याचा प्रचंड मोठा स्ट्रेस आज सहनच होईना !  तितक्यात एका मित्राचा फोन येतो कामानिमित्ताने, आणि पहिल्यांदा मी असं म्हणते की , "यार आज मोडून पडायला झालय मला ! " ,तोपर्यंत मैत्रिणीच्या आजारपणाच टेंशन काही कमी झालेलं नव्हतं. गेल्या दोन दिवसापासून केवढी आजारी आहे ! तितक्यात तिसऱ्या मैत्रिणीचा मेसेज येतो की, "अरे ती फोन उचलत नाहीये.तिची खुशाली कळत नाहीये ! " ,मी म्हंटलं , "मीच तिला फोन बंद ठेवायला सांगितलाय.मी बघते ! " पण असं म्हणताना माझं काळीज चिरत गेलं ... खरच फोन उचलत नाहीये ! का ?  काळजी वाटायला लागते ! आणि अचानक तिचा फोन येतो.पण फोनवरच्या आवाजाने ती निश्चितच बरी नाहीये हे कळल्यावर मात्र अजूनच जीव घाबरा होतो. आता घरी पोहोचेपर्यंत खरंच स्ट्रेस सहन होईना की काळजाला बरं वाटेना म्हणून मग घरी आल्याबरोबर गरम पाण्याने अंघोळ केली त्यानंतर आपसूक झाडूकडे हात वळला की , घर साफ केलं तर मन ही साफ होईल असं वाटून गेलं ! एवढयात सोसायटीतून गणपती बसवला आहे त्या ठिकाणाहून गाण्याचे बोल ऐकू आले ,
'इतनी शक्ती हमे देना दाता 
मन का विश्वास कमजोर हो ना 
हम चले नेक रस्ते पे हमसे 
भूलकर भी कोई भूल हो ना 
किती खरे आहे ना ! आपण किती स्ट्रेस घेतो ? किती ताण देतो आपल्या मनाला ? पण एक छोटीशी गोष्ट विसरतो की जर तुम्ही नेक काम करत आहात तर भिती कसली?तुमचं स्वतःशी इमान राखून केलेलं काम क्षणिक दुःखाने , संकटांनी विरून जाणारं निश्चितच नसतं हेच सांगणारे मित्र -मैत्रीणींचे धीराचे शब्द, गाण्याच्या एक लकेर , घर आणि मन अधून -मधून साफ करत राहणं या साऱ्यांतून जगायलाच उर्जा मिळत असते, नाही ?  आणि एका क्षणात हायस झालं तोपर्यंत घर पण झाडून झालं आणि मन पण कसं लख्ख झालं ! 
                        -आरती

Wednesday, September 12, 2018

अती लघुकथा ( अ.ल.क.)

1.
ती - काल दिवसभर range नव्हती.
तो - बरं ! 
ती - पोहोचलास ते फोन करून कळवलंही नाही 
तो - नाही. थकलो होतो.
( शांतता ) 
ती - : झाल ना तुटक जगणं लगेच तिकडे जाऊन ! 
         ( फोन कट झाला.) 
आता पुन्हा त्याच्या क्षणभर शब्दांची वाट पाहणं सुरु झालं.
  
                       - आरती



2.
 "तु सोबत असण हाच मला न्याय असेल ! तु असला की जगणं जगणं असत ,मला तु हवाय सोबत बाकी जग नाही", बोलता बोलता ती अचानक निःशब्द झाली .

                         आरती

3.
       "मी जीवनात दुसऱ्यांदा एवढा अस्वस्थ आहे ", निर्विकारपणे समुद्राकडे पाहत त्यानं बोलायला सुरूवात केली , "एक ते सुरुवातीचे दिवस, रात्र रात्र जागणं, तुझ्यासाठी झुरणं आणि आता हे ! "
        " मी दोषी आहे तुझी " आर्ततेने ती प्रतिसाद देते आहे मात्र नजर मिळवू शकत नाही.
       आज ती समुद्रा किनारी एकटी बसलेली अन सोबत या असंख्य आठवणी 
                         आरती


4.

" मी उत्तर द्यायला बांधील नाही कारण मी माणस बदलत नाही " 
       
" बांधील नसला तरी मी तर तुला बांधले गेले आहे ना ! निदान माझा त्रास तर कमी करशील? " 
               
                        आरती



5.

तू असणं गरजेच आहे जगण्याला ! 

                       आरती

Sunday, August 26, 2018

पालक सभा




---------------------------------------- पालक सभा --------------------------------------------



आज मुलाच्या शाळेत गेले होते. सर्क्युलर मध्ये दिलेल्या वेळे प्रमाणे वेळेत गेले तरीही जवळपास तास भर तिथे बसले होते. अर्थात त्याही वेळेचा मला फायदाच झाला कारण पालकांच्या समस्या आणि शिक्षणाचे दृष्टिकोन याकडे अनेक अंगाने पाहण्याची संधी मला मिळाली. तेथे अनेक पालक आपल्या मुलांच्या समस्या मांडत होते ते ऐकून थक्क झाले. मुळात मुलं वाढवत असताना त्यांना समजून घेत घेत अगदी काळजीपूर्वक त्यांना उमलू देणे अपेक्षित आहे. हळुवारपणे त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी देणे हे आपल्या व्यवस्थेकडून अपेक्षित आहे. 

तर , एका गोड मुलीच्या आई ची अशी तक्रार होती की, तिची मुलगी तिच्या मोठ्या बहिणी सारखं आणि तिच्याहून लहान म्हणजे जवळपास पहिली किंवा दुसरीला असलेल्या बहिणीपेक्षा सफाईदार इंग्रजी बोलत नाही. त्यांच्याइतके मार्क्स ती मिळवत नाहीए. आई तावातावाने बोलतेय तेवढ्यात सोबत आलेल्या मुलीने विरोध केला कि आई असं नाही , आई तिथेच ओरडली,’’शांत बस किमान इथे तर माझं ऐक आणि मला टीचरशी बोलू दे’’. मुलगी शांत बसली. कोणतीही भावनिक चिडचिड मुलांपासून कधीही लपत नाही याचमुळे पालक आणि शिक्षक दोहोंनीही भान ठेवायला हवं आहे कारण सततची चिडचिड स्वभावात रुजते आणि स्वभावाचा भाग बनून जाते.

मग टीचरने तिला जवळपास सर्व सूचना अगदी तळमळीने म्हणजे ज्याला आपण बेंबीच्या देठापासून म्हणू शकू; पण तितक्याच सौम्य भाषेत सांगितले,’’ इंग्रजीतच बोलायला हवं ...नो मराठी ओके. आणि बघ सानिका, सायली कशा उत्तर देतात स्कोर करतात तस तुही करायला हवं आहे. तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे तू पण खूप खूप हुशार व्हायचं ना. आणि लहान बहिणीला जास्त कळत नाही तर तिला त्रास द्यायचा नाही आणि आईने सांगितलं ते ऐकायलाच हवं’’. मला त्यावेळी त्या मुलीच्या मनात काय खळबळ चालली असेल या विचारानेच गलबलून आलं. कारण कोणत्याही परिस्थितीत एका व्यक्तिमत्वाची दुसऱ्या व्यक्तिमत्वाबरोबर तुलना होऊ शकत नाही. 

प्रत्येक मूल हे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. त्याची तुलना इतरांशी केल्यास मुलात न्यूनतेची भावना वाढीस लागून द्वेष ,मत्सर, राग किंवा मग अत्यंत बुजरेपणा या गोष्टी जोपासण्यास आपणच मदत करत असतो, हे आपल्या ध्यानातही येत नाही. मुलांच्या भविष्याबद्दलची काळजी जेव्हा आमिशाच्या रूपात व्यक्त केली जाते तेव्हा ती अत्यंत धोकादायक असते. तू परीक्षेत चांगले मार्क मिळवले नाहीत तर तुझ्या आई बाबांना वाईट वाटेल, हाही त्यातलाच एक प्रकार ! त्या ऐवजी त्या गोड मुलीत असलेल्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यात अधिकाधिक कशा संधी उपलब्ध करून देता येतील यावर चर्चा केली असती तर पालक-शिक्षक मीटिंगचा (ओपन हाऊस) खरा उद्देश सार्थकी लागला असता. 

यानंतर आलेल्या मुलामध्ये तर मला तारे जमीन पर मधला ईशानच दिसला. कृश आणि अत्यंत बुजरा त्याची नजर सतत झुकलेली. शिक्षिकेच्या समोर बसताच तिने अशा प्रकारे हुश्श केलं कि जणू काही बर झालं सापडलात आता मी तक्रारींचे पाढे वाचायला मोकळी. त्यात, ‘’ये कुछ भी नहीं लिखता, कुछ भी नहीं करता, इसके सारे नोटबुक्स इनकम्प्लिट है, सिर्फ इधर उधर देखता रहात है हम तो सबको एक सरिखा हि सिखाते है!’’ आणि खरी मेख तर इथेच आहे प्रत्येक मूल जर सारखं नाही तर सारखं शिकवून चालेल का ? त्याच्या वडिलांच्या तर शिक्षिकेपेक्षा जास्त तक्रारी होत्या ते तर जणूकाही तोफाच डागत होते शिवाय ते कबूलही करत होते कि,माझा धाक जरा जास्तच होतोय. त्यातही या मुलाला गणिताची आवड आहे हेही त्यांच्या बोलण्यातून कळले. मी हताशपणे मनात म्हटलं, अरेरे लेकराने जावं कुणाकडे ?

पालकांच्या किंवा शिक्षकांच्याही बहुतेक वेळा लक्षातच येत नाही की, अजाण वयात मुलांवर सतत बंधनांचा मारा केल्याने,धाकदपटशहा केल्याने, सारखा त्यांच्या मागे लकडा लावल्याने आणि त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याने होणारे परिणाम फार भयंकर असतात. लहान मुलांवर होणारे घातक परिणाम हा त्यांच्या ना कळत्या वयात, त्यांना अनाकलनीय अशी नीतिमूल्यं त्यांच्यावर जबरदस्तीने लादण्याने होत असतो. प्रत्येक मूल आत्ममग्न असत आणि सगळं जग आपलं आहे असं त्याला वाटत असत त्यामुळे लहान वर्गात जेव्हा मुले एकमेकांची वस्तू न सांगता घेतात त्याला तू इतरांच्या वस्तू घेऊ नकोस आणि याला चोरी म्हणतात आणि चोरी करणे वाईट असते अशा प्रकारे दिलेलं डोस किंवा नैतिकतेचे शिक्षण त्याच्या व्यक्तिमत्वाला सुरुंग लावणारच ठरत. त्याऐवजी कुणाची वस्तू आवडली तर त्या व्यक्तीला / मित्रा ती वस्तू मला आवडली आहे आणि मी ती थोडा वेळ वापरासाठी घेऊ का असं विचारून घे आणि समूहातल्या सर्वच मुलांना जेव्हा हे कळेल की आपली वस्तू दुसऱ्याला देण्यातही एक वेगळाच आनंद असतो तेव्हा जी मुलं आपला मोह टाळू शकत नाही त्यांचा प्रश्न विधायक मार्गाने सुटून त्याच्या व्यक्तीमत्वात नीतिमूल्याची भरच पडते. शिक्षा आणि धडा यातील फरकही करता येणं तितकच महत्वाचं आहे. स्वतःच्या समाधानासाठी सतत इतरांना त्रास देणं आणि इतरांच्या जीवावर स्वतःला पाहिजे तस वागणं किंवा मुलांना तस वागू देणं हे मुलांच्या दृष्टीने वाईटच! 

रात्री माझ्या मुलासोबत गप्प्पा मारताना कळले की, या मुलाला कुणीही मित्र नाही कारण तो पेपर मध्ये काहीच लिहीत नाही ,तो वर्गात खूप ओरडतो, कुणाचे कपडे ओढतो तर कधी राग आला की चावतो, असं बरंच काही. माझ्या मुलाला मी त्याच्याशी मैत्री करायला सांगितलं. तर, मी नाही करणार, कारण बाकी कुणीच नाही करत तर मी केल्यावर मलापण चोर म्हणतील. आता मी माझ्या मुलाला विश्वास दिला कि असं नाही होणार. माझा मुलगा त्या एकाकी मुलाशी मैत्री करेन की नाही ते मला माहीत नाही पण त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची भूमिका ही अधिक सक्षम होणं मला जास्त गरजेच वाटत आहे. 

उत्तम संस्कार याचा अर्थ इतरांचा विचार करणे नव्हे तर इतरांच्या भावना जाणून घेणे होय. इतरांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करता येणं आणि इतरांना दुखावण्यापासून आपल्याला थांबवता येणं म्हणजे संस्कार ! शिष्टाचार म्हणजे संस्कार नव्हेत ! 

आपल्या मुलांना शिक्षा आणि बक्षीस दिलेच पाहिजे या कल्पनेला धरून बरेच पालक आणि शिक्षण संस्था चालत असतात आणि त्याला न्याय देण्याचा ते आपापल्यापरीने पूर्ण न्याय देत असतात. त्यांनी हे स्वतःला पटवलेलं असत की, ते त्या मुलाच्या भल्यासाठीच ते करत आहेत. एका शिक्षण संस्थेच्या शाळेतील संचालकांशी बोलताना ते मला म्हटल्याचे मला आठवते आहे की,तुम्ही सरकारी शाळेचे शिक्षक मुलांना कित्ती मारतात !आम्ही शिक्षा केली जरा रागावले तर बिघडले कुठे? त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नसल्याने मी वाद घालण्यात माझी शक्ती खर्च केली नाही. परंतु अशा विचारसरणीच्या व्यक्तीच्या हातात असंख्य मुलांचे भविष्य आहे या विचाराने अंगावर सरसरून काटा आला.

मला वाटत, शिक्षकाचं काम अगदी सोपं आहे तितकंच आव्हानात्मकही आहे. मुलाला कशात रस आहे हे शोधून काढायचं आणि त्यात पूर्णपणे समरसून त्यातून त्याला बाहेर पडायला मदत करयाची कारण जी गोष्ट माणसाला आवडते तिचा पुरेपूर अनुभव घेतल्या नंतरच माणूस नवीन गोष्ट शिकण्यासाठी वळतो. यात दोन गोष्टी महत्वाच्या घडतात त्या म्हणजे मुलाला त्याच्या आवडीचे काम केल्याने अतिशय आनंद मिळतो तो सृजनाचा आनंद असतो. शिवाय नवनवीन गोष्टी शिकण्याची आंतरिक ऊर्मीही निर्माण होते. 

मुलं शिक्षकांवर अत्यंत मनापासून प्रेम करतात कारण आई वडिलांवर करता यावं इतकं ते सोपं आणि नैसर्गिक असत. बऱ्याचदा तर आई वडिलांवरच्या दबलेल्या प्रेमाचाही ते शिक्षकांवर भरभरून वर्षाव करत असतात. तसंच प्रेमाने मुलांना आहे तसं स्वीकारल्यास अनेक समस्या दूर होतील कारण कृती अबोध मनाला स्पर्श करते केवळ शब्द,उपदेश तेथपर्यंत पोहचू शकत नाह. मुलांकडून कोणतीही अपेक्षा न करत मुलांना 'दिलं' पाहिजे.

बालमानसशास्त्राचा शिक्षकांनी सतत अभ्यास करत राहायला हवा आहे ते केवळ शाळेत नेमलेल्या चाईल्ड साइकोलॉजिस्टचच काम आहे असं समजू नये. मुलांचं अनेक अंगांनी येणार मनोविश्लेषण आणि स्वतःच देखील मनोविश्लेषण समजून घेणं तितकाच महत्वाचं आहे. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे इतरांच्या बाबतीत आपण अधिक उदार होतो. हीच गोष्ट पालकांसाठी देखील लागू होते. यामुळे मुलांच्या दृष्टिकोनास समोर जाताना पालक आणि शिक्षकांची संभ्रमावस्था राहणार नाही. प्रत्येक मूल वेगळं असून त्यातील चूक- बरोबर मान्य करण्याची क्षमता निर्माण होईल आणि ते केल्यानेच त्यात सुधारणाही करता येईल.

शिक्षकाला शिक्षक होण्याआधी मुलांची आई होता आले पाहिजे. जस शिक्षकांचं तसं पालकांचं ! चांगलं पालकत्व म्हणजे आपली महत्वाकांक्षा आपल्या मुलांत पाहणे नव्हे तर आपल्या मुलांशी तादात्म्य पावणे होय. मुलाच्या प्रत्येक कृती मागचा हेतू समजण्याची जाण असायला हवी आहे. हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्या हेतूंना किंवा संतापाला अजिबात सुद्धा थारा न देण्याची कुवत म्हणजे चांगले पालकत्व होय. मूल ज्या दोन मूळ संस्थांत घडते, कुटुंब आणि शाळा तिथल्या या आधारस्तंभांनी स्वतःला मुलाच्या दृष्टीने सक्षम केल्यास आनंदाच्या ऊर्जेने भरभरून असलेला प्रवाह म्हणजेच मुले घडवण्यात पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात फार मोठा हातभार लागेल.



आरती विठ्ठल बोराडे

प्राथमिक शिक्षक, इगतपुरी

aartigadhe@gmail.com

Monday, August 20, 2018

#कुठे_गेल्या_या_टॉपर_मुली ?

#कुठे_गेल्या_या_टॉपर_मुली ? 
            
              माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामाच्या ठिकाणचे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने ती बदली होत नाही तोवर माहेरीच राहून कामाच्या ठिकाणी येत असे. नोकरीचे गाव माहेरापासून जवळ होते. मैत्रीण शनिवारी दुपारी सासरी जायची आणि सोमवारी तशीच कामावर यायची. फार व्यक्त होण्याचा स्वभावच नसल्याने अगदी सुरुवातीलाच सोमवारी आली कि मंगळवार पासून तीच रडणं चालू असायचं. जवळपास आम्हाला दोन एक महिने लागले हे कळायला कि ती सासरी गेल्यावर तिथली कामवाली बाई बंद केलेली असायची आणि दोन दिवस एवढ्या मोठ्या खटल्याची धुणीभांडी करून तिचे हात सुजलेले असावयाचे आणि प्रचंड वेदना व्हायच्या. बरं ती शहरात वाढलेली नोकरी करणारी मुलगी अवाक्षर हि न काढता हे सारं करत राहिली. शिवाय कामाच्या ठिकाणी जायला दहा वर्षांपूर्वी साधन नसल्याने किमान चार किलोमीटर अंतर चालत जावे यावे लागे. म्हणजे सोमवारी सासरहून आल्यानंतर रोजची पायपीट चुकणारी नव्हती. त्यात सासरी कसलीही कमी नाही. भला मोठा बंगलो, वॊशिंग मशीनसह सर्व सोयी सुविधांनी युक्त घर शिवाय लग्नात तिला कोणत्याही वस्तूची कमी राहू दिली नव्हती आई वडिलांनी. एवढं सर्व असताना तिची परीक्षा घेण्याची हि कोणती विकृत मानसिकता? विशेष म्हणजे तिला upsc परीक्षा interview चे पत्र आलेले असतानांही तिला तू हे करू शकत नाहीस असं म्हणून जाऊ दिले नाही. ती लग्नापूर्वी पासून परीक्षेचा अभ्यास करत होती. लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच तिला हे पत्र मिळाले होते. 
                       यानंतर ती जेव्हाही भेटली तेव्हा फक्त रडते. संसार नवरा मुलं सासू- सासरे , नणंदा -भाचे सगळा परिवार सुखात आहे. नवऱ्याचे अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तरीही फक्त रडते कारण तिचे पंख किती सुरेख आणि बळकट होते याचे साक्षीदार होते मी आणि ते छाटले जाण्याच्या दुर्दैवी क्षणांचीहि साक्षीदार होते मी. 
                       गेल्या आठवड्या पासून कुठे गेल्या या टॉपर मुली च्या शीर्षकाने फिरणारा मॅसेज वाचला आणि असे असंख्य प्रसंग समोर उभे राहिले. सोबत काम करणाऱ्या पाच आकडी किंवा अगदी ऐंशी हजारापर्यंत पगार घेणाऱ्या महिलांच्या समस्यां ह्याच स्वरूपाच्या आहेत. त्यांना कामाहून घरी आल्यानंतर कामात थोडी मदत मिळावी म्हणून कामाला बाई लावण्याची परवानगी हवी आहे किंवा मग मुलांचा अभ्यास तरी घरातल्या कुण्या व्यक्तीने घ्यावा असे तिला वाटते किंवा मग माझ्या मासिक पाळीच्या काळातील वेदना जास्त असतात त्या नाही सर्वांसमोर सांगता येत नाही म्हणून तरी नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात आणि कामात हातभार लावावा. शारीरिक आणि मानसिक आंदोलनांच्या काळात घरातल्या आपल्या माणसांनी समजून घ्यावे हि प्रत्येक स्त्रीची किमान अपेक्षा असते. तशी ती करण्यात काही गैरही नाही मात्र त्या पूर्ण न झाल्यास अनेकदा वादाला तोंड फुटते आणि मग तिला तिच्या नोकरीचा आणि पगाराचा घमंड आहे असा सरळ सरळ अर्थ काढला जातो. या जात्यात अडकलेल्या असंख्य स्त्रिया नंतर स्वतःला यातच अडकून घेण्याची सवय लावून घेतात काही प्रचंड भरडल्या जातात तर काही लवकरच यातून बाहेर पडून आपले आयुष्य जगू लागतात. अर्थात यातल्या कुठलीही टप्प्यावरच्या स्त्रीला जगणे सोपे नाहीच कारण तितक्या उदार आणि विशाल दृष्टीकोनाची अजूनतरी आपली सामाजिक परिस्थिती नाही हे मान्य करायला हवे आहे. 
                   एका कवीने लिहून ठेवले आहे, 
                All women in the world, 
                speaks same language of silence.
 किंवा मग 
              'नाही पुसत ग कोणी रंग रुपला आपुल्या 
              दाणं पाखडून द्याया नुसत्या आपण सुपल्या '
किंवा मग 
            ' कानातल्या कुडकांना, आला अहेवाचा मान 
              गुंजभर सोन्यासाठी, बाई जल्माची गहाण 
              हातीपायी बेड्या तिच्या, नाकी कानी टोचतात 
              संसाराचे रखवाले, जीवावर उठतात 
             तिच्या जलमाची नोंद नाही कुठं दप्तरात 
             तिच्या मरणाची वर्दी नाही कुण्या कचेरीत '

                 यांसारख्या बाईपणाचे अस्तर उलगडून मांडणाऱ्या कवींना माझा सलामच आहे मात्र परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे हे आपल्या सामाजिक उत्थानाचं खूप मोठं अपयश आहे. 
            स्त्रीच्या नव्या सामाजिक दर्जानुसार पुरुषाच्या  दृष्टिकोनात फरक पडलेला असला तरी स्त्रीला सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यात वेगवेगळे मुखवटे घेऊन वावरावे लागते तसं पुरुषाचं नसत. कारण स्त्री घराबाहेर जेवढी यशस्वी होईल तितके तिला कुटुंबात नम्र वागावे लागते. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तिला सामाजिक सिद्धतेसाठीच्या संघर्षात तिचे स्त्रीसुलभ गुणविशेष सांभाळणे  या कसरतीत तिचा विलक्षण गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया परंपरागत भूमिकेकडे वळत आहेत. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत्व फुलावण्यापेक्षा परंपरागत भूमिकांत अडकणे जास्त सुखकर आणि सोपे आहे. पण काळाचे चाक उलटे फिरवता येत नाही. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने परिस्थितीतील बदल मोकळया मानाने स्वीकारणे हेच श्रेयस्कर नाही काय ? अशाने स्त्रीला संपूर्ण माणूस म्हणून दर्जा निश्चित प्राप्त होईल. मग या टॉपर मुली निश्चितच हरवणार नाहीत.  
              
                                         - आरती बोराडे
                                 प्राथमिक शिक्षक , इगतपुरी

Monday, July 23, 2018

कृष्ण







जब भी अपने अंदरकी आवाज सुनती हूँ ... 
दिल बिखरसा जाता है ! 
अपनीही चेतना जैसे 
प्रकाश की किरणे बिखेरती है !

 कुछ उदासी छा जाती है !
अपने दिलसे फिर कोई सोयी हुई उम्मीद 
तुम्हारी परछायी बनकर 
जीने को मजबूर करती है !
जाने ऐसा क्यू लगता है की मैं 
अपने कृष्ण के पास खींची जा रही हूँ !

पर क्या पता ये मेरे अंदरसे बाहर कब आयेगा ?
सोचती हूँ खूब सारीं किताबें 
अपने अंदर सिंच लू पर पुरी पढ़ ही नहीं पाती.... 
हर एक शब्दमें मुझे तुम नजर आते हो ! 

 शायद मेरे अंदर की चेतना
या फिर जीने का वजूद है ये कृष्ण ...

समझ नहीं पाती मैं ....... 
कई बार तूम ख्वाबोमे आये ! 
मेरे रूहसे आत्मा तक समाये !
तो रोज रोज की सपनोकी आँखमिचोलि 
मैंने तुमसे मिलकर रोक ली ! 
पर तुमको लबौमे बता नहीं पायी !

ये भी शायद तुम्हे सच ना लगे ! कोई बात नहीं ! 
पर कही कही कृष्ण मिल रहा है !

               *- आरती*





Tuesday, May 1, 2018

चौकटीतलं जगणं


वाटतं जगावं असं मस्तमवाल 
दहा ते पाच ऑफीस टायमिंग पलीकडे 
विचार न करणाऱ्या घड्याळ्याच्या काट्यासारख 
कुठल्याही जाणिवा नसल्यासारखं 

सकाळच्या चहासोबत वर्तमानपत्रात 
नॅशनल इंटरनॅशनल चघळण्यात 
आणि अपडेट राहण्यात  केवढ भूषण 
मलाही वाटतं मग घ्यावी चिकटवून 
लेबलं स्वतःला स्मार्टनेसची 

शॉपिंग , डेटिंग , लॉन्ग ड्राइव 
फेसबूक , व्ह्ट्सअप स्टेटस 
ऑन फेमिली टूर ..... दुबई , स्वित्सलन्ड 
वगैरे वगैरे ....

काळ्या काचेतल पांढरं जग 
पब , क्लब , बार , हाई स्टेटस 

तिसऱ्या लेन मधून जाणाऱ्या 
होंडा सिटीच्या काचेतून दिसत नाही मग 
नाल्याखालची घाण , पलिकडचे छप्पर 
आणि गळणारे पाईप होतात ज्यांचे आसरे , 
 रानातल्या पायवाटेन एकटीनंं मैलौनमैल तुडवणारी 
चिमुकलीच्या पावलांची होणारी दमछाक 
स्मरणारच नाही मग 
चिंग झालेल्या अवस्थेत 
जात नाही  लक्ष 
फ्लायओवेर् खाली 
मोगऱ्याच्या फुलांभोवती सांडलेल्या 
बालपणाच्या सुगंधाकडे 

घुसळ घुसळ घुसळल 
शेवटी या भणंग मेंदूच्या अंधारातून 
असंख्य मुंग्यांच मुंग्या बाहेर पडल्या 
कुरतडत राहिल्या पेशी बाहेर जातांनाही 
उरल्या सुरल्यांची घुसलीत डोकी 
नर्व्हस सिस्टममधे पक्की ......

जमत नाहिए चौकटीतल जगणं 
जमत नाहिए चौकटीतल जगणं ! ! 



- आरती 

कवितेची वादळवाट


नीर्बीज प्रलोभनं दाखवून
स्वप्नांचा थयथयाट घडवून आणणारी
आपल्या मनातली आशा
सतत का जिवंत ठेवावी ?
उषःकालापूर्वीच अस्त झालेला असतांना !


क्षितिजासारखीच आशाही पांगत गेलेली
' ए जिंदगी गले लगा ले '
म्हणत एक किरण जातो आरपार
थेट मध्यातून ....
काळजाच्या कोपऱ्याकोपऱ्यात
चेतवीत जातो ....
भयंकर तंद्रीत असलेली विस्तवरेषा
काळी फुलं विझावीत त्यासरशी !


पुन्हा एक निष्फळ प्रयत्न
मला उठविण्याचा !
निरागस प्रेमावर ठिगळं जोडून पाहिली तू ..
आतली नस बोटं घालून
उसवीत राहिली रक्ताळलेले रेशीम धागे ...

तू म्हणत राहिलास ,
' चल जाऊ अनंतापर्यंत '
अन मी निवडीत राहिले
 कवितेची वादळवाट ' ....!




- Rती 

Sunday, April 29, 2018

थडगे

हात सुटला तसा श्वासही सुटला 
आणि मग सुरू झाले वादळांचे 
पाठशिवणीचे अनाव्रूत्त खेळ ! 

कधी मी अखंड समुद्र बनले 
शोधीत राहिले माझ्यात 
खोलवर असलेला तुझा तळ ! 
एकही आशेचा किरण पोहोचू नये 
तुझ्यापर्यँत ? 
संयत लाटांखाली असंख्य त्सुनामी 
आयुष्य मात्र प्रवाही अखंडपणे ! 
मी तळाशी निपचित पडून ! 

कधी धावत जावे 
अवकाशाच्या अंतापर्यंत 
उर फुटेस्तोवर ! 
संपत नाही प्रवास तुझ्यापर्यँतचा ! 
लवलेश नाही मी जिवंत असण्याचा ! 
जखमी श्वास देहात भरू पाहतो
नवी जिंदगी ......

पण छे .....तू नाहीच जवळ 
तेव्हा थडग्यापाशी माझ्या 
मी वाट पाहत थांबलेली ....! 


- आरती 

Tuesday, April 17, 2018

अराजकता म्हणजे वेगळं काय असतं ?



कित्तीदा लिहिण्याचा प्रयत्न करूनही मी असमर्थ ठरत राहीले यावर लिहिण्यासाठी !  या क्रौर्यावर शब्दांनी व्यक्त  होणे अवघडच! नाही अशक्यच!
         तू गेल्यापासून रात्र अधिकच भयाण झालीय. नरश्वापदांच्या उच्छादाने उगवणाऱ्या सूर्यालाही भिती वाटू लागलीय , कोणत्या क्रौर्याची परिसिमा असलेलं कांड आज मला पहावं लागणार याची ! 
       तशी तू निर्भयापूर्वीही आणि नंतरही अनंत यातनांतून आपला जीव गमावते आहेस. तू एक लहानसं लेकरु नसून केवळ एक मादी आहेस हे एकच सत्य उरावं का सरते शेवटी ?  माणूस माणूसच राहिलेला नाही ? 
       लहान मूलं , लेकरं , स्त्रीया पाशवी अत्याचाराच्या बळी ठरतात हा इतिहास असला तरी तो वर्तमान आहे आणि हे माणूपणाच्या नाशाकडे नेणारं ठरतंय ! भविष्य हे असू नये इतकंच. 
          मला बोलताही येत नाही ,कल्पनाही करवत नाही आणि व्यक्तही होता येत नाहीए इतकी एकावर एक भयानक कृत्य मेंदूला बधीर करतायत. तसंही तुमच्या-माझ्या किंवा सगळ्यांच्या बोलण्याने , व्यक्त होण्याने काय फरक पडतोय हाही एक प्रश्नच आहे.
           भास होतायत मला रात्री गाढ झोपेत. असंख्य मुली भयाण जंगलातून प्रचंड संख्येने दाही दिशांनी टाहो फोडून माझ्यात लपत आहेत. कुणाच्याही अगदी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून मी पाहू शकत नाहीये कारण मला या चिमुरडीचे नितांत सुंदर डोळे आता अवकाश भरून राहिलेले दिसतात.
            यावर कहर म्हणजे ज्या लेकराचा इतक्या क्रूरपणे यातनामय अंत व्हावा याचे व्हिडियो आहेत का हे पोर्न साइटवर चेक व्हावे!अत्यंत हिडीस , किळसवाणा प्रकार ...
           आता माझाच देह हजार जिव्हांनी टाहो फोडतो आहे. माझी योनी अस्ताव्यस्त होऊन पडल्याचा भास मला होतो आहे!लेकरा ,माझ्या पोटात देखील मी तुला लपवू शकत नाहीये माझा देह हा फक्त एक स्त्रीदेह उरला आहे!
           कालच रस्त्याने जातांना एका सहा-सात वर्षाच्या मुलीला अंगणात खेळताना पाहिले आणि अंगावर सर्रकन काटा आला! या देशाच्या भूमीवर ही लेक खरंच सुरक्षित आहे? रात्री झोपताना माझा बाळ कुशीत येतो त्याला अधिकाधिक कुरवाळते कारण मनातली भीती एखाद्या राक्षसासारखी मोठी होत राहते! 
           देव-दानव, स्वर्ग-नरक सब झूठ तर आहे यावर मी ठाम होते आणि आहे! पण माणूस आहे हेही आता खोट ठरलय! आपण राहतो तिथे फक्त आणि फक्त हिंस्र नरश्वापदे आहेत!
          आता मोर्चे ,मार्च सर्व काही होणार. व्हायलाच हवे ! निषेध होऊन रस्त्यावर उतरायला हवे! पण दोनचार दिवसात सारं काही विसरून पुन्हा एकदा त्याच बुरसटलेल्या विचारांनी जीवन सुरू होईल, इथेच तर माणूसपणाची हार आहे! मी एक माणूस, एक आई आणि माणूसपणातली लेखनी म्हणून हरले आहे. माणुसकी मेली आहे आमच्यातली कधीच!अराजकता म्हणजे वेगळं काय असतं ? 
          आता कृपया धार्मिक ,जातीय आणि पक्षीय राजकारण यात घुसडू नका! लेकरं मरताहेत इतकी यातना घेऊन, मुल म्हणुन जगु द्या रे ! माणूस म्हणून जगू द्या रे ! व्यवस्थाहीन समाज असल्यासारखे का जगतोय आपण ?  
                            -आरती बोराडे , नाशिक

Sunday, February 11, 2018

एक गाव

एक गाव वसलाय
माझ्या छोट्या खिडकीशी 
शांत झालेला गलका 
बोलू लागला स्वतःशी 

अदबीने पहुडले 
मेंदीचे गोंदण तिथे
काळ्याकुट्ट आकाशाचे 
भावबंध चांदण्यांशी

तिरिपवेडे कवडसे
वेचते अंगणातूनी
अलगद शिंपलेले
रंगधागे आकाशी

मातीच्या गर्भातूनी
हिरवळली दिठी ही
स्वप्नदाणे पेरलेले
उगवून ये भुकेशी

त्रिमितीच्या पारदर्शी
कडांतुनी सांडलेले
अनवट सावल्यांचे
प्रतिबिंब हृदयाशी

'मी' पण निजले सख्या
बाहुपाशी गंधाळूनी
एकांगी चुरस लागे
आवेगाची ती काळाशी

         -आरती बोराडे


हो ... ! आहे माझा व्हॅलेंटाईन !

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*हो !  आहे माझा व्हॅलेंन्टाईन ...*
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
               
*जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू*
*जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू*

*पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू*

*सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू*

                  अगदी जिवाचा जिवलग ! काळजाचा तुकडा !तुकडा कसलं आख्ख काळीजच ! आठ वर्षांचा आमचा प्रेमाचा सहवास. पुढच्या संपूर्ण श्वासांना जोडलेला ! 

                   काय , किती अन् कसं सांगू आमच्या दोघांबद्दल ... ! कुठून सुरूवात करावी बरं ? चॉकलेट पासून करूया का ? कारण चॉकलेट्स त्याला एवढी आवडतात की बस्स ! कदाचित माझ्यापेक्षाही जास्त ! आमच्यासाठी तर रोजच चॉकलेट डे असतो ! इतकी सारी चॉकलेट्स घरात असतात ! ती फक्त त्याला देण्यासाठी ! आपण मात्र मग मुद्दाम त्याच्याशी भांडावं, त्याला चिडवाव आणि तो रुसला की त्याची समजूत काढावी! आणि फुलं...! फुलं तर त्याला खूप प्रिय आहेत. फूल आणलं म्हणजे हळुवार तो आपल्या गालांवर फुलाचा स्पर्श करणार! मस्तपैकी डोळे बंद करून सुवास घेणार आणि मला गच्च मिठी मारून thank you पण म्हणणार ! अशा काय अन् किती आठवणी! आणि किस वरून तर आमच रोज भांडणं होणार ! कारण मला हवा असतो kiss! त्याच्या दोन्ही गालांवरचा ! आणि तो मात्र देणार नाही सहजासहजी !
          मला आठवतं खूप सुरुवातीलाच मी त्याला टेडी आवडतात म्हणून टेडी बनवायचे शिकूनच घेतलं! आणि त्याच्यासाठी टेडी बनवले! पण टेडीमुळे माझ प्रेम वाटल गेला असं वाटायला लागलं teddy बनवल्यावर!
         तो नसला की मग मात्र सारं जग सुन सुन होत ! कारण माझ्या कुशीत शिरल्याशिवाय त्याला झोप येत नाही ,हे मला ठाऊक आहे आणि मी तरी कुठे राहते त्याच्याशिवाय? त्याचे खाणं ,पिणं ,उठणं ,बसणं ,खेळणं बागडणं , हुंदडणं सगळ सगळ अगदी काळजात भरून राहिलय ! हो ...आहे तो माझा व्हॅलेंटाईन!
           त्याच्यासाठीचा असणारे प्रेम एक दिवस व्यक्त करण्यासाठी नाही! वर्षभरात रोजच असतो आमचा व्हेलेंन्टाइन ! तो खऱ्या अर्थानं एका आईचं काळीज आहे!
 प्रत्येक आई साठी रोजच असत तिचं लेकरू तिचा व्हॅलेंटाईन! असा व्हॅलेंटाईन फक्त माझाच आहे असं नाही ! प्रत्येक आई साठी हाच असतो तिचा खरा व्हॅलेंटाईन! तिचं अवघं विश्वच भरून जातं त्याच्या इवल्याशा छुमछुमनं !  फुलपाखराचे दिवस भुर्रकन उडून जातात; पण खर्या अर्थाने कुणासाठी तरी जगणं ,श्वास घेणं , जगण्याचा अर्थ कळणं हे घडतं ते केवळ लेकरू आल्यानंतरच! माझी बोलक्या डोळ्यांची बाहुली, बछडी ,छबु ,बबडी ,परी, शोनूलं हे सगळे अंतःकरणातून तेव्हाच येते जेव्हा घरात इवलीशी पावलं हुंदडू लागतात!! फुलपाखरांच्या दिवसातला व्हेलेंटाईन तर तिच्या लक्षातही राहत नाही ! कारण खरा आयुष्यभराचा व्हेलेंटाईन तिच्या आयुष्यात आलेला असतो आणि ती रोजच भरभरून भरभरून प्रेम करत असते! एका आईचं काळीज म्हणजे तिच्या मुलासाठी हक्काचं स्थान ...... खरा व्हॅलेंटाईन!!! म्हणूनच म्हटलं *हो आहे माझा व्हॅलेन्टाईन* माझं लेकरू .....आणि तो रोजच मी भरभरून साजरा करते ,आयुष्यभर करणार ! श्वासाच्या शेवटापर्यंत !!! माझं पिल्लू ....आत्ताच जेवू घालून निजवलाय !  मीही पटापट जेवून आवरते अन् झोपते त्याला कुशीत शिरायचं असतं ना माझ्या ....... 
                           *- तरुणची ताई ( आई ) आरती बोराडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Friday, February 9, 2018

पॉज



                 वाक्यात विराम असतो ना थोडासा श्वास घेण्यासाठी थांबण्याचा काळ .......!  पॉज् .... म्हणजे थांबणं. भावनांचा आणि विचारांचा आविष्कार करण्यासाठी जसा लेखनात विराम महत्त्वाचा तसा आयुष्यातही ऊर्जेसाठी हा विराम ठरणारी माणसंही तितकीच महत्त्वाची ! यति वगैरे नाही म्हणणार मी पण अशी माणसं ही उर्जेचं ठिकाण असतं ,असं मला वाटतं ! पॉज .... ! कधी येतो तर कधी घ्यावा लागतो ,कधी वाक्य पूर्ण होत आणि आपण सहजच थांबतो.हा पॉज् कधी अल्प असतो तर कधी मोठा असतो! बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द आणि वाक्यामध्ये जसा हा विराम महत्वाचा तसंच आयुष्याच्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर आयुष्याचा नीट अर्थ उलगडावा म्हणून अशी विराम ठरणारी ऊर्जेची चिन्ह आपल्या आयुष्यात येतात! तीच असतात आपल्या ऊर्जेचा पॉज्! काही माणसे पूर्णविराम, जी आयुष्याच्या पूर्ण काळापर्यंत स्नेहबंध जोडून जातात. काही अल्पविराम , काही स्वल्पविराम तर काही अगदीच प्रश्नचिन्ह सुद्धा! आणि या अशा विविध चिन्हांच्या माध्यमातूनच आपल्या आयुष्याच लेखनही अर्थवाही आणि सहज सुलभ होतं जातं यात काही शंकाच नाही!  
                 म्हणजे बघा हं आपण एखाद्या नवीन ठिकाणी नोकरीनिमित्त जातो. तिथे काही काळ नोकरी करतो बदली होते, नवीन ठिकाणी जातो. पण आधीच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांची attachment आपल्यासाठी ऊर्जास्रोत झालेली असते. कधीकधी ही attachment आयुष्यभर राहते, हे स्नेह धागे आयुष्यभर जोडले जातात तर कधी फक्त थोड्याच काळात पुरती मर्यादित राहतात. पण असतात मात्र ऊर्जास्रोत! त्या त्या वेळी त्या त्या काळी आपल्यासाठी झालेली! किंवा कधीकधी अचानक काहीतरी काम पडतं आणि कुणीतरी धावून येतो आपल्या मदतीला! 
                   आपली जिवलग मैत्रीण, सखी, कामाच्या ठिकाणच्या मैत्रिणी, समोरच्या आजी, शेजारच्या काकू, वॉचमन ताई, कामवाल्या मावशी , गाडीमध्ये सोबत जाणारे सहकारी, शेजारच्या डेस्कवरचे सहकारी, ऑफिसमधले सहकारी, किंवा तालुक्यातले जिल्ह्यातले आपल्या क्षेत्राशी संबंधित जवळचे अनेक लोक, आता तर व्हॅटस् अॅप समूहाच्या द्वारे पण कितीतरी लोक आपल्या संपर्कात येतात. त्यातला चांगला वाईट असा दुनियादारीचा भाग जर सोडला तर काही चांगल्या लोकांशी खूप चांगले संबंध तयार होतात! चांगल्या मैत्रिणी मिळतात , काका , दादा ,ताई अशी छान नातीही तयार होतात ! अडीअडचणीला एकमेकांना मदत करतात! थोड्या काळासाठी का असेना पण अशी प्रेमाची नाती असतात! हे पॉज् आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात ! 
             असे हे विराम कळणं ,उमगणं ,समजणं आणि त्यांना सांभाळही तितकच महत्त्वाचं! विरामचिन्हं शिवायच आयुष्य कसं निरस असेल नाही! चला तर मग आयुष्यातल्या अशा विराम चिन्हांचा शोध घेऊ या ! त्यांना जपू या ! सांभाळू या ! तरच आयुष्याचं लेखन हे अर्थवाही सुगम आणि खरोखर सुंदर होईल ! 
                                 -आरती बोराडे 
                

Friday, January 26, 2018

भार




आठवांचा भार होतो 
तू मनात सतार होतो 

येत नाही तू नव्याने 
सूर तो गंधार होतो 

संपवावे स्वतःलाच 
एवढा बेजार होतो ? 

डोइवर का उन्हाचा 
सावलीला ज्वार होतो 

ताप येता लेकराला 
बाप ही तो घार होतो 

दूर इतुका , भेटण्याला 
अवघड , परि विचार होतो 

येत जाता गझल ओठी 
काळजाच्या पार होतो 

            -आरती 

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...