Sunday, August 26, 2018

पालक सभा




---------------------------------------- पालक सभा --------------------------------------------



आज मुलाच्या शाळेत गेले होते. सर्क्युलर मध्ये दिलेल्या वेळे प्रमाणे वेळेत गेले तरीही जवळपास तास भर तिथे बसले होते. अर्थात त्याही वेळेचा मला फायदाच झाला कारण पालकांच्या समस्या आणि शिक्षणाचे दृष्टिकोन याकडे अनेक अंगाने पाहण्याची संधी मला मिळाली. तेथे अनेक पालक आपल्या मुलांच्या समस्या मांडत होते ते ऐकून थक्क झाले. मुळात मुलं वाढवत असताना त्यांना समजून घेत घेत अगदी काळजीपूर्वक त्यांना उमलू देणे अपेक्षित आहे. हळुवारपणे त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी देणे हे आपल्या व्यवस्थेकडून अपेक्षित आहे. 

तर , एका गोड मुलीच्या आई ची अशी तक्रार होती की, तिची मुलगी तिच्या मोठ्या बहिणी सारखं आणि तिच्याहून लहान म्हणजे जवळपास पहिली किंवा दुसरीला असलेल्या बहिणीपेक्षा सफाईदार इंग्रजी बोलत नाही. त्यांच्याइतके मार्क्स ती मिळवत नाहीए. आई तावातावाने बोलतेय तेवढ्यात सोबत आलेल्या मुलीने विरोध केला कि आई असं नाही , आई तिथेच ओरडली,’’शांत बस किमान इथे तर माझं ऐक आणि मला टीचरशी बोलू दे’’. मुलगी शांत बसली. कोणतीही भावनिक चिडचिड मुलांपासून कधीही लपत नाही याचमुळे पालक आणि शिक्षक दोहोंनीही भान ठेवायला हवं आहे कारण सततची चिडचिड स्वभावात रुजते आणि स्वभावाचा भाग बनून जाते.

मग टीचरने तिला जवळपास सर्व सूचना अगदी तळमळीने म्हणजे ज्याला आपण बेंबीच्या देठापासून म्हणू शकू; पण तितक्याच सौम्य भाषेत सांगितले,’’ इंग्रजीतच बोलायला हवं ...नो मराठी ओके. आणि बघ सानिका, सायली कशा उत्तर देतात स्कोर करतात तस तुही करायला हवं आहे. तुझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे तू पण खूप खूप हुशार व्हायचं ना. आणि लहान बहिणीला जास्त कळत नाही तर तिला त्रास द्यायचा नाही आणि आईने सांगितलं ते ऐकायलाच हवं’’. मला त्यावेळी त्या मुलीच्या मनात काय खळबळ चालली असेल या विचारानेच गलबलून आलं. कारण कोणत्याही परिस्थितीत एका व्यक्तिमत्वाची दुसऱ्या व्यक्तिमत्वाबरोबर तुलना होऊ शकत नाही. 

प्रत्येक मूल हे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्याच स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. त्याची तुलना इतरांशी केल्यास मुलात न्यूनतेची भावना वाढीस लागून द्वेष ,मत्सर, राग किंवा मग अत्यंत बुजरेपणा या गोष्टी जोपासण्यास आपणच मदत करत असतो, हे आपल्या ध्यानातही येत नाही. मुलांच्या भविष्याबद्दलची काळजी जेव्हा आमिशाच्या रूपात व्यक्त केली जाते तेव्हा ती अत्यंत धोकादायक असते. तू परीक्षेत चांगले मार्क मिळवले नाहीत तर तुझ्या आई बाबांना वाईट वाटेल, हाही त्यातलाच एक प्रकार ! त्या ऐवजी त्या गोड मुलीत असलेल्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यात अधिकाधिक कशा संधी उपलब्ध करून देता येतील यावर चर्चा केली असती तर पालक-शिक्षक मीटिंगचा (ओपन हाऊस) खरा उद्देश सार्थकी लागला असता. 

यानंतर आलेल्या मुलामध्ये तर मला तारे जमीन पर मधला ईशानच दिसला. कृश आणि अत्यंत बुजरा त्याची नजर सतत झुकलेली. शिक्षिकेच्या समोर बसताच तिने अशा प्रकारे हुश्श केलं कि जणू काही बर झालं सापडलात आता मी तक्रारींचे पाढे वाचायला मोकळी. त्यात, ‘’ये कुछ भी नहीं लिखता, कुछ भी नहीं करता, इसके सारे नोटबुक्स इनकम्प्लिट है, सिर्फ इधर उधर देखता रहात है हम तो सबको एक सरिखा हि सिखाते है!’’ आणि खरी मेख तर इथेच आहे प्रत्येक मूल जर सारखं नाही तर सारखं शिकवून चालेल का ? त्याच्या वडिलांच्या तर शिक्षिकेपेक्षा जास्त तक्रारी होत्या ते तर जणूकाही तोफाच डागत होते शिवाय ते कबूलही करत होते कि,माझा धाक जरा जास्तच होतोय. त्यातही या मुलाला गणिताची आवड आहे हेही त्यांच्या बोलण्यातून कळले. मी हताशपणे मनात म्हटलं, अरेरे लेकराने जावं कुणाकडे ?

पालकांच्या किंवा शिक्षकांच्याही बहुतेक वेळा लक्षातच येत नाही की, अजाण वयात मुलांवर सतत बंधनांचा मारा केल्याने,धाकदपटशहा केल्याने, सारखा त्यांच्या मागे लकडा लावल्याने आणि त्यांना उपदेशाचे डोस पाजण्याने होणारे परिणाम फार भयंकर असतात. लहान मुलांवर होणारे घातक परिणाम हा त्यांच्या ना कळत्या वयात, त्यांना अनाकलनीय अशी नीतिमूल्यं त्यांच्यावर जबरदस्तीने लादण्याने होत असतो. प्रत्येक मूल आत्ममग्न असत आणि सगळं जग आपलं आहे असं त्याला वाटत असत त्यामुळे लहान वर्गात जेव्हा मुले एकमेकांची वस्तू न सांगता घेतात त्याला तू इतरांच्या वस्तू घेऊ नकोस आणि याला चोरी म्हणतात आणि चोरी करणे वाईट असते अशा प्रकारे दिलेलं डोस किंवा नैतिकतेचे शिक्षण त्याच्या व्यक्तिमत्वाला सुरुंग लावणारच ठरत. त्याऐवजी कुणाची वस्तू आवडली तर त्या व्यक्तीला / मित्रा ती वस्तू मला आवडली आहे आणि मी ती थोडा वेळ वापरासाठी घेऊ का असं विचारून घे आणि समूहातल्या सर्वच मुलांना जेव्हा हे कळेल की आपली वस्तू दुसऱ्याला देण्यातही एक वेगळाच आनंद असतो तेव्हा जी मुलं आपला मोह टाळू शकत नाही त्यांचा प्रश्न विधायक मार्गाने सुटून त्याच्या व्यक्तीमत्वात नीतिमूल्याची भरच पडते. शिक्षा आणि धडा यातील फरकही करता येणं तितकच महत्वाचं आहे. स्वतःच्या समाधानासाठी सतत इतरांना त्रास देणं आणि इतरांच्या जीवावर स्वतःला पाहिजे तस वागणं किंवा मुलांना तस वागू देणं हे मुलांच्या दृष्टीने वाईटच! 

रात्री माझ्या मुलासोबत गप्प्पा मारताना कळले की, या मुलाला कुणीही मित्र नाही कारण तो पेपर मध्ये काहीच लिहीत नाही ,तो वर्गात खूप ओरडतो, कुणाचे कपडे ओढतो तर कधी राग आला की चावतो, असं बरंच काही. माझ्या मुलाला मी त्याच्याशी मैत्री करायला सांगितलं. तर, मी नाही करणार, कारण बाकी कुणीच नाही करत तर मी केल्यावर मलापण चोर म्हणतील. आता मी माझ्या मुलाला विश्वास दिला कि असं नाही होणार. माझा मुलगा त्या एकाकी मुलाशी मैत्री करेन की नाही ते मला माहीत नाही पण त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची भूमिका ही अधिक सक्षम होणं मला जास्त गरजेच वाटत आहे. 

उत्तम संस्कार याचा अर्थ इतरांचा विचार करणे नव्हे तर इतरांच्या भावना जाणून घेणे होय. इतरांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करता येणं आणि इतरांना दुखावण्यापासून आपल्याला थांबवता येणं म्हणजे संस्कार ! शिष्टाचार म्हणजे संस्कार नव्हेत ! 

आपल्या मुलांना शिक्षा आणि बक्षीस दिलेच पाहिजे या कल्पनेला धरून बरेच पालक आणि शिक्षण संस्था चालत असतात आणि त्याला न्याय देण्याचा ते आपापल्यापरीने पूर्ण न्याय देत असतात. त्यांनी हे स्वतःला पटवलेलं असत की, ते त्या मुलाच्या भल्यासाठीच ते करत आहेत. एका शिक्षण संस्थेच्या शाळेतील संचालकांशी बोलताना ते मला म्हटल्याचे मला आठवते आहे की,तुम्ही सरकारी शाळेचे शिक्षक मुलांना कित्ती मारतात !आम्ही शिक्षा केली जरा रागावले तर बिघडले कुठे? त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नसल्याने मी वाद घालण्यात माझी शक्ती खर्च केली नाही. परंतु अशा विचारसरणीच्या व्यक्तीच्या हातात असंख्य मुलांचे भविष्य आहे या विचाराने अंगावर सरसरून काटा आला.

मला वाटत, शिक्षकाचं काम अगदी सोपं आहे तितकंच आव्हानात्मकही आहे. मुलाला कशात रस आहे हे शोधून काढायचं आणि त्यात पूर्णपणे समरसून त्यातून त्याला बाहेर पडायला मदत करयाची कारण जी गोष्ट माणसाला आवडते तिचा पुरेपूर अनुभव घेतल्या नंतरच माणूस नवीन गोष्ट शिकण्यासाठी वळतो. यात दोन गोष्टी महत्वाच्या घडतात त्या म्हणजे मुलाला त्याच्या आवडीचे काम केल्याने अतिशय आनंद मिळतो तो सृजनाचा आनंद असतो. शिवाय नवनवीन गोष्टी शिकण्याची आंतरिक ऊर्मीही निर्माण होते. 

मुलं शिक्षकांवर अत्यंत मनापासून प्रेम करतात कारण आई वडिलांवर करता यावं इतकं ते सोपं आणि नैसर्गिक असत. बऱ्याचदा तर आई वडिलांवरच्या दबलेल्या प्रेमाचाही ते शिक्षकांवर भरभरून वर्षाव करत असतात. तसंच प्रेमाने मुलांना आहे तसं स्वीकारल्यास अनेक समस्या दूर होतील कारण कृती अबोध मनाला स्पर्श करते केवळ शब्द,उपदेश तेथपर्यंत पोहचू शकत नाह. मुलांकडून कोणतीही अपेक्षा न करत मुलांना 'दिलं' पाहिजे.

बालमानसशास्त्राचा शिक्षकांनी सतत अभ्यास करत राहायला हवा आहे ते केवळ शाळेत नेमलेल्या चाईल्ड साइकोलॉजिस्टचच काम आहे असं समजू नये. मुलांचं अनेक अंगांनी येणार मनोविश्लेषण आणि स्वतःच देखील मनोविश्लेषण समजून घेणं तितकाच महत्वाचं आहे. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे इतरांच्या बाबतीत आपण अधिक उदार होतो. हीच गोष्ट पालकांसाठी देखील लागू होते. यामुळे मुलांच्या दृष्टिकोनास समोर जाताना पालक आणि शिक्षकांची संभ्रमावस्था राहणार नाही. प्रत्येक मूल वेगळं असून त्यातील चूक- बरोबर मान्य करण्याची क्षमता निर्माण होईल आणि ते केल्यानेच त्यात सुधारणाही करता येईल.

शिक्षकाला शिक्षक होण्याआधी मुलांची आई होता आले पाहिजे. जस शिक्षकांचं तसं पालकांचं ! चांगलं पालकत्व म्हणजे आपली महत्वाकांक्षा आपल्या मुलांत पाहणे नव्हे तर आपल्या मुलांशी तादात्म्य पावणे होय. मुलाच्या प्रत्येक कृती मागचा हेतू समजण्याची जाण असायला हवी आहे. हे सगळं करत असताना आपल्या स्वतःच्या हेतूंना किंवा संतापाला अजिबात सुद्धा थारा न देण्याची कुवत म्हणजे चांगले पालकत्व होय. मूल ज्या दोन मूळ संस्थांत घडते, कुटुंब आणि शाळा तिथल्या या आधारस्तंभांनी स्वतःला मुलाच्या दृष्टीने सक्षम केल्यास आनंदाच्या ऊर्जेने भरभरून असलेला प्रवाह म्हणजेच मुले घडवण्यात पर्यायाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात फार मोठा हातभार लागेल.



आरती विठ्ठल बोराडे

प्राथमिक शिक्षक, इगतपुरी

aartigadhe@gmail.com

Monday, August 20, 2018

#कुठे_गेल्या_या_टॉपर_मुली ?

#कुठे_गेल्या_या_टॉपर_मुली ? 
            
              माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामाच्या ठिकाणचे अंतर शंभर किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने ती बदली होत नाही तोवर माहेरीच राहून कामाच्या ठिकाणी येत असे. नोकरीचे गाव माहेरापासून जवळ होते. मैत्रीण शनिवारी दुपारी सासरी जायची आणि सोमवारी तशीच कामावर यायची. फार व्यक्त होण्याचा स्वभावच नसल्याने अगदी सुरुवातीलाच सोमवारी आली कि मंगळवार पासून तीच रडणं चालू असायचं. जवळपास आम्हाला दोन एक महिने लागले हे कळायला कि ती सासरी गेल्यावर तिथली कामवाली बाई बंद केलेली असायची आणि दोन दिवस एवढ्या मोठ्या खटल्याची धुणीभांडी करून तिचे हात सुजलेले असावयाचे आणि प्रचंड वेदना व्हायच्या. बरं ती शहरात वाढलेली नोकरी करणारी मुलगी अवाक्षर हि न काढता हे सारं करत राहिली. शिवाय कामाच्या ठिकाणी जायला दहा वर्षांपूर्वी साधन नसल्याने किमान चार किलोमीटर अंतर चालत जावे यावे लागे. म्हणजे सोमवारी सासरहून आल्यानंतर रोजची पायपीट चुकणारी नव्हती. त्यात सासरी कसलीही कमी नाही. भला मोठा बंगलो, वॊशिंग मशीनसह सर्व सोयी सुविधांनी युक्त घर शिवाय लग्नात तिला कोणत्याही वस्तूची कमी राहू दिली नव्हती आई वडिलांनी. एवढं सर्व असताना तिची परीक्षा घेण्याची हि कोणती विकृत मानसिकता? विशेष म्हणजे तिला upsc परीक्षा interview चे पत्र आलेले असतानांही तिला तू हे करू शकत नाहीस असं म्हणून जाऊ दिले नाही. ती लग्नापूर्वी पासून परीक्षेचा अभ्यास करत होती. लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच तिला हे पत्र मिळाले होते. 
                       यानंतर ती जेव्हाही भेटली तेव्हा फक्त रडते. संसार नवरा मुलं सासू- सासरे , नणंदा -भाचे सगळा परिवार सुखात आहे. नवऱ्याचे अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आहे. पण तरीही फक्त रडते कारण तिचे पंख किती सुरेख आणि बळकट होते याचे साक्षीदार होते मी आणि ते छाटले जाण्याच्या दुर्दैवी क्षणांचीहि साक्षीदार होते मी. 
                       गेल्या आठवड्या पासून कुठे गेल्या या टॉपर मुली च्या शीर्षकाने फिरणारा मॅसेज वाचला आणि असे असंख्य प्रसंग समोर उभे राहिले. सोबत काम करणाऱ्या पाच आकडी किंवा अगदी ऐंशी हजारापर्यंत पगार घेणाऱ्या महिलांच्या समस्यां ह्याच स्वरूपाच्या आहेत. त्यांना कामाहून घरी आल्यानंतर कामात थोडी मदत मिळावी म्हणून कामाला बाई लावण्याची परवानगी हवी आहे किंवा मग मुलांचा अभ्यास तरी घरातल्या कुण्या व्यक्तीने घ्यावा असे तिला वाटते किंवा मग माझ्या मासिक पाळीच्या काळातील वेदना जास्त असतात त्या नाही सर्वांसमोर सांगता येत नाही म्हणून तरी नवऱ्याने त्या समजून घ्याव्यात आणि कामात हातभार लावावा. शारीरिक आणि मानसिक आंदोलनांच्या काळात घरातल्या आपल्या माणसांनी समजून घ्यावे हि प्रत्येक स्त्रीची किमान अपेक्षा असते. तशी ती करण्यात काही गैरही नाही मात्र त्या पूर्ण न झाल्यास अनेकदा वादाला तोंड फुटते आणि मग तिला तिच्या नोकरीचा आणि पगाराचा घमंड आहे असा सरळ सरळ अर्थ काढला जातो. या जात्यात अडकलेल्या असंख्य स्त्रिया नंतर स्वतःला यातच अडकून घेण्याची सवय लावून घेतात काही प्रचंड भरडल्या जातात तर काही लवकरच यातून बाहेर पडून आपले आयुष्य जगू लागतात. अर्थात यातल्या कुठलीही टप्प्यावरच्या स्त्रीला जगणे सोपे नाहीच कारण तितक्या उदार आणि विशाल दृष्टीकोनाची अजूनतरी आपली सामाजिक परिस्थिती नाही हे मान्य करायला हवे आहे. 
                   एका कवीने लिहून ठेवले आहे, 
                All women in the world, 
                speaks same language of silence.
 किंवा मग 
              'नाही पुसत ग कोणी रंग रुपला आपुल्या 
              दाणं पाखडून द्याया नुसत्या आपण सुपल्या '
किंवा मग 
            ' कानातल्या कुडकांना, आला अहेवाचा मान 
              गुंजभर सोन्यासाठी, बाई जल्माची गहाण 
              हातीपायी बेड्या तिच्या, नाकी कानी टोचतात 
              संसाराचे रखवाले, जीवावर उठतात 
             तिच्या जलमाची नोंद नाही कुठं दप्तरात 
             तिच्या मरणाची वर्दी नाही कुण्या कचेरीत '

                 यांसारख्या बाईपणाचे अस्तर उलगडून मांडणाऱ्या कवींना माझा सलामच आहे मात्र परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच आहे हे आपल्या सामाजिक उत्थानाचं खूप मोठं अपयश आहे. 
            स्त्रीच्या नव्या सामाजिक दर्जानुसार पुरुषाच्या  दृष्टिकोनात फरक पडलेला असला तरी स्त्रीला सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जीवन यात वेगवेगळे मुखवटे घेऊन वावरावे लागते तसं पुरुषाचं नसत. कारण स्त्री घराबाहेर जेवढी यशस्वी होईल तितके तिला कुटुंबात नम्र वागावे लागते. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तिला सामाजिक सिद्धतेसाठीच्या संघर्षात तिचे स्त्रीसुलभ गुणविशेष सांभाळणे  या कसरतीत तिचा विलक्षण गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया परंपरागत भूमिकेकडे वळत आहेत. कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वत्व फुलावण्यापेक्षा परंपरागत भूमिकांत अडकणे जास्त सुखकर आणि सोपे आहे. पण काळाचे चाक उलटे फिरवता येत नाही. तेव्हा समाजातील प्रत्येक घटकाने परिस्थितीतील बदल मोकळया मानाने स्वीकारणे हेच श्रेयस्कर नाही काय ? अशाने स्त्रीला संपूर्ण माणूस म्हणून दर्जा निश्चित प्राप्त होईल. मग या टॉपर मुली निश्चितच हरवणार नाहीत.  
              
                                         - आरती बोराडे
                                 प्राथमिक शिक्षक , इगतपुरी

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...