कित्तीदा लिहिण्याचा प्रयत्न करूनही मी असमर्थ ठरत राहीले यावर लिहिण्यासाठी ! या क्रौर्यावर शब्दांनी व्यक्त होणे अवघडच! नाही अशक्यच!
तू गेल्यापासून रात्र अधिकच भयाण झालीय. नरश्वापदांच्या उच्छादाने उगवणाऱ्या सूर्यालाही भिती वाटू लागलीय , कोणत्या क्रौर्याची परिसिमा असलेलं कांड आज मला पहावं लागणार याची !
तशी तू निर्भयापूर्वीही आणि नंतरही अनंत यातनांतून आपला जीव गमावते आहेस. तू एक लहानसं लेकरु नसून केवळ एक मादी आहेस हे एकच सत्य उरावं का सरते शेवटी ? माणूस माणूसच राहिलेला नाही ?
लहान मूलं , लेकरं , स्त्रीया पाशवी अत्याचाराच्या बळी ठरतात हा इतिहास असला तरी तो वर्तमान आहे आणि हे माणूपणाच्या नाशाकडे नेणारं ठरतंय ! भविष्य हे असू नये इतकंच.
मला बोलताही येत नाही ,कल्पनाही करवत नाही आणि व्यक्तही होता येत नाहीए इतकी एकावर एक भयानक कृत्य मेंदूला बधीर करतायत. तसंही तुमच्या-माझ्या किंवा सगळ्यांच्या बोलण्याने , व्यक्त होण्याने काय फरक पडतोय हाही एक प्रश्नच आहे.
भास होतायत मला रात्री गाढ झोपेत. असंख्य मुली भयाण जंगलातून प्रचंड संख्येने दाही दिशांनी टाहो फोडून माझ्यात लपत आहेत. कुणाच्याही अगदी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून मी पाहू शकत नाहीये कारण मला या चिमुरडीचे नितांत सुंदर डोळे आता अवकाश भरून राहिलेले दिसतात.
यावर कहर म्हणजे ज्या लेकराचा इतक्या क्रूरपणे यातनामय अंत व्हावा याचे व्हिडियो आहेत का हे पोर्न साइटवर चेक व्हावे!अत्यंत हिडीस , किळसवाणा प्रकार ...
आता माझाच देह हजार जिव्हांनी टाहो फोडतो आहे. माझी योनी अस्ताव्यस्त होऊन पडल्याचा भास मला होतो आहे!लेकरा ,माझ्या पोटात देखील मी तुला लपवू शकत नाहीये माझा देह हा फक्त एक स्त्रीदेह उरला आहे!
कालच रस्त्याने जातांना एका सहा-सात वर्षाच्या मुलीला अंगणात खेळताना पाहिले आणि अंगावर सर्रकन काटा आला! या देशाच्या भूमीवर ही लेक खरंच सुरक्षित आहे? रात्री झोपताना माझा बाळ कुशीत येतो त्याला अधिकाधिक कुरवाळते कारण मनातली भीती एखाद्या राक्षसासारखी मोठी होत राहते!
देव-दानव, स्वर्ग-नरक सब झूठ तर आहे यावर मी ठाम होते आणि आहे! पण माणूस आहे हेही आता खोट ठरलय! आपण राहतो तिथे फक्त आणि फक्त हिंस्र नरश्वापदे आहेत!
आता मोर्चे ,मार्च सर्व काही होणार. व्हायलाच हवे ! निषेध होऊन रस्त्यावर उतरायला हवे! पण दोनचार दिवसात सारं काही विसरून पुन्हा एकदा त्याच बुरसटलेल्या विचारांनी जीवन सुरू होईल, इथेच तर माणूसपणाची हार आहे! मी एक माणूस, एक आई आणि माणूसपणातली लेखनी म्हणून हरले आहे. माणुसकी मेली आहे आमच्यातली कधीच!अराजकता म्हणजे वेगळं काय असतं ?
आता कृपया धार्मिक ,जातीय आणि पक्षीय राजकारण यात घुसडू नका! लेकरं मरताहेत इतकी यातना घेऊन, मुल म्हणुन जगु द्या रे ! माणूस म्हणून जगू द्या रे ! व्यवस्थाहीन समाज असल्यासारखे का जगतोय आपण ?
-आरती बोराडे , नाशिक