Friday, October 13, 2017

सलाम मुंबई सलाम

सलाम मुंबई सलाम 
जान मेरी सलाम 
ठेच लागते तुला 
अन् काळजाचा ठोका चुकतो 
सारे हळहळतात , पळतात 
पुन्हा येतात कुशीत तुझ्या 
मेंदू झोपून जातो 
गटाराच पानी पिऊन 
आणि अचानक भल्या पहाटे 
सारे विव्हळू लागतात- बचाव बचाव 
बातम्यांचा सुकाळ , टिवटिव टिवटिव 
फडफडु लागले हे झेंडे ते झेंडे 
सोफरामायसीनचा नुसता धुमाकूळ 

त्या लाल पुलाकडे 
मला पहायचेच नव्हते मुंबई 
समोर उभ राहून मला ठोकायचा होता 
सलाम ......
तुझ्या सळसळणाऱ्या धमन्यांना सलाम 
त्यातल्या गुठळ्यांना सलाम 
असंख्य बायपास स्वतःहून निर्माण करणाऱ्या 
तुझ्या क्षमतेला सलाम ....
सलाम मुंबई मेरी जान सलाम 

कोणाची माय , कोणाचा बाप 
लढणारा तुटून पडला एक हात 
चिऊचा घास काऊनं नेला 
प्रिन्सेस कपाळावरचा डेडबॉडी नंबर 
ताज समजून मिरवून गेली 
प्रिन्सेस तुला अखेरचा निरोप 
पण मुंबई तु अशीच धाव 
माझ्या खुर्चीला आणखी लाल टेकू
बाकी आहेत ........
बाकी सलाम मुंबई सलाम ! ! ! 
                      -आरती बोराडे 

Wednesday, July 26, 2017

सावित्रीची लेक



सावित्रीची लेक मी 
घेऊनी मशाल हाती 
समतेचा ध्यास उरी 
पेटवू चला ज्योती 

अबला नि अनाथांची 
होऊनी तू ग माऊली 
वसा पुढे चालविला 
ज्योतिबाची तू सावली 

ओळख आम्हा देऊनी 
पावन झाली ही धरित्री 
ऋणात राहू तुझ्या सदा
क्रांतीज्योती तू सावित्री 

पीडीत अन् दुःखीतांचे 
माय बाप होऊनी 
सारिला दूर अंधकार 
ज्ञानज्योती लावूनी 

धडपड ही बलिदान तुझे 
लावू आम्ही सार्थकी 
सक्षम निर्भया सबला आम्ही 
दावू नारी शक्तिची एकी

             - आरती बोराडे

Saturday, July 8, 2017

पैठणी

डोळ्यात भरणारा नीलमणी रंग

भरजरी काठ अन

काठांवर हिरवे,निळे,लाल पिसांचे

नाचरे मोर ...


अंगावर टाकताच म्हणाला होतास

‘खूप सुंदर दिसतेएस’

मी न्याहाळत राहिले आरशात

मोर नाचरे

अन चोरट्या नजरेने तुझ्या डोळ्यातील

फुललेले पिसारे ...


मला हवी होती जॉर्जेट साडी

तर म्हणालास ‘भरजरी काठांची

फशन जुनी होत नाही कधीच’

‘पुरुषांना कुठे कळत एवढं साडीतल’

ही नजर मात्र तूच ओळखली

अन साडीतल नव्हे ग ...

मनाच्या तळातल शोधतो मी ...!


म्हटलं होत, ‘नको घेउस

एवढी महाग साडी’

‘अग गुलाबी चितचोर,

लग्नातली हौस राहिली होती नं?’

दाखवीत म्हटलास पदरवरचा मोर


कपाटाच्या कोपऱ्यातून

हळूच डोकावले आज अचानक मोर

तुझ्या आठवांसाराखेच .....


पाखरांवर पखरण करता करता

पडल्या असंख्य घड्या

मी ही मग सजले नाही

मनसोक्त न्हात कैफात तुझ्या


रेशमी काठांवर भेगाळलेली बोटं

आपसूक फिरत राहिली

शोधत तुझी उब

पाखरही उडून जातील

आभाळात दूर

मी मात्र त्याच आभाळात

शोधीत राहील तुझ्या

स्वप्नांच्या रंगरेषा ....


कित्येक वर्षांनी तू दिलेल्या

नीलमणी रंगावर

उठलेल्या घड्या बोलू लागल्या


स्वतःशीच ...तू गेल्यावर ....!



             -आरती बोराडे

मासोळ्या डोळ्यांची नार ..!


मासोळ्या डोळ्यांची नार 
भल्या पहाटे ....
चढ़ते डोंगराचा उतार 
पेरते , लावते , आवते स्वप्नं 

उतरते खाली देते हाळी 
उन्हासोबत खाली
झोळी खाली , पोट खाली 
मनभर हसू लावते गाली 

काटे-कुटे , फांद्या 
खोडक्यांचा संभार 
मोळी डोक्यावर स्वप्नांची 

शेण, माती ,लिंपन ,शिंपन 
सडा ,रांगोळी , सारवण 
रेखाटते ती हळुवार पुन्हा स्वप्नं 

कांदा कालवण , नागली भाकर 
ऐकते तृप्ती चा ढेकर 
स्वतःच्या ताटात वाढते स्वप्नं !!

मासोळ्या डोळ्यांची नार 
भल्या पहाटे 
झाड-लोट , अंथरुण , पांघरूण 
उठते ,आवरते ,झटकते स्वप्नं 
टिफिन ,बॉटल ,बॅग 
ऑफीस फाइल्स ,घड्याळ ,रुमाल  
प्रत्येकाला हातात 
स्वतःच्या डब्यात मांडणीवर झाकून ठेवते स्वप्नं 

उतरती उन्हे स्वयंपाकात मग्न 
दळणदाणा , दुधासाठी रांग 
तुटलेली बटणे , इस्त्री ,सुई-धागा
उसवत जाते ती विणलेल स्वप्नं 

किलबिलाट , चहाचा घाट 
बिस्किट , नाश्ता 
साग्रसंगीत वरण भात , तुपाची धार 
पुन्हा वाढते स्वतःच उसवलेल स्वप्नं 

मासोळ्या डोळ्यांची नार 
भल्या पहाटे ......
लावते कूकर , भरते पर्स - बॉटल 
विचारांचे पेन , पेनड्राईव्ह  , लपटॉप 

विसरून जाते कॉट वर स्वप्नं 
ऑफीस , टीमवर्क ,क्लायंट , मीटिंग 
कॉन्फिडेन्स , टार्गेट कंप्लीट 
उन्हे उतरतीला सोबत खुर्चीत स्वप्नं 

हॉटेल , डिनर , स्वीट्स 
बॅक टू होम विथ शॉपिंग 
गुड नाईट किस 

मासोळ्या डोळ्यांची नार 
डोळ्यातली स्वप्नं .....
रात्रीच्या दूधासोबत उतू जातात !! 
वैश्विक स्वप्न !!

     -आरती बोराडे 

Wednesday, May 24, 2017

चाकं-वेगाची

मी घेऊन निघते गाडी 
प्रचंड आत्मविश्वासाने 
विचारांची चाकं धावतात 
गाडीपेक्षाही जास्त वेगाने 
कर्णकर्कश हॉर्न आणि नजरा 
जातात अंगावरून माझ्या 
वाऱ्याच्या वेगाने ...

काही नजरा ब्रेक लावण्याच्या प्रयत्नाच्या 
काही कुत्सितपणाच्या ,तर काही तुला 
डिवचल्याच्या दुःखाच्या....

दोन्ही मिरर मधून दिसत राहतात 
उंचावणाऱ्या भिवया 
आणि समोरून येणाऱ्या नजरांचे 
नखशिखांत न्याहाळण्याचे कसब 
विरून जाते वाऱ्याच्या झोतात !

मी पिऊन घेते हा वारा 
स्वातंत्र्याचा निश्चिंतपणे !

वेळेचं आणि वेगांच गणित 
होत राहतं एक्सिलेटर सोबत 
तरीही माझ्यासाठी चालवायला 
जरा सोप्प्या गाड्यांचीच कल्पना अन 
निर्मिती झाली ....

ओढणी माझी उगीचच 
लांब झाल्यासारखी वाटते तुला 
अन ब्रेंक तुझ्याच हातात 
असल्याचे भासही !

पण काळजी करू नकोस 
मी ही शिकलेय तंत्र 
गियर कंट्रोल करण्याच 
नियंत्रित वेगाचं ..
नव्या युगाच्या नांदीला 
स्वप्न उद्याच्या आशेचं !

ध्येय गाठण्याच्या उर्मीनं 
निघालेल्या रस्त्यावर .....
छेदणाऱ्या असंख्य नजरा कापीत 
निघालीय वेगानं माझी चाकं !

मला गर्दीच गर्दी हवीय 
गर्दीतल्या माझ्या वेगाची !
बघ,पाउल निघालेच आहे घरातून
आता चाकं फिरताहेत वेगाने !
माझ्या चाकांनी निघालेय मी 
महामार्ग होण्याच्या दिशेने ......


                -आरती बोराडे 



Saturday, April 22, 2017

तू,कविता अन कॉफी

खिडकीतल्या विस्तीर्ण आभाळानं 
तू होऊन बरसावं ....
तेव्हाच माझी फोडणी 
द्यायची वेळ झालेली 
नुकतीच लगबगीचं अंथरूण 
झटकून उठलेली जडावलेली शरीरं....
आठवांची चिकटे 
उघडू देत नाहीत मेंदूच्या पापण्या
....

मी मात्र सगळ सोडून 

भिजतेय तुझ्यात...
तू आलास कि !
तू,कविता अन कॉफी ....
मस्तच जमते मैफिल !!!
भिजत राहते अंतरीची ओल 
निवांत रिपरिप पाहतांना....
पाझरत जातो
खोलवर रुजण्यासाठी....

अंकुरावी ओढ तुझी 

भंगणारच समाधी....
कुकरची शिटी साद घालत राहते....
तू मात्र ओढून घेतोस 
धुकट भेटीत...
तू,कविता अन कॉफी....

असंख्य ऋतू कूस 

बदलून येतात....
अन...
जीवनाचे सार साठत जाते 
मातीच्या गर्भात
खोलवर स्वच्छ नितळ होऊन !
तुझं येणं 
झरा होऊन वाहतं
तुझ्याच रुपात !

भुकेलेली पिल्लं 

परततात घरट्यात पंखांखाली 
उसवत जातो 
तुझ्यात विणलेला धागा 
तू मात्र तसाच 
कोसळत असतोस....
पुन्हा मैफिल जमवण्याची 
आस लावून....
मिटल्या पापण्याखालची 
स्वप्नं जागी होतात 
तुझ्यासोबाताची कॉफी आठवून.....!!!


                - आरती बोराडे 

Wednesday, April 19, 2017

आई

'दर आषाढात जाव लागतं 
माहेरच्या माउल्यांना'
सांगत असते आई ...
चार महिन्याच्या बाळाचं 
डोकं ठेवून ये म्हणतेय
त्यांच्या पायावर !

सोबत म्हसोबाचा आणि 

सात माउल्यांचा नैवेद्य -----
मेथीची भाजी असलेला 
भातासह !

गावाच्या बाहेर असलेल्या किंवा 

कधी कधी पुलाच्या खाली ,
नदीवर वसतात तिथे या देवी
बारव तर कधी साती आसरा म्हणतात ज्याला !
आम्ही पण घेतो मग मुकाट्यानं
त्यांचा आसरा .....
लेकीबाळी होऊन लेकराबाळांसह 

'येता-जाता नारळ पण फोडीत जावं' 

सांगत राहते आई ....

मला काही मागायचंच नव्हत !

फक्त बाळाला घट्ट धरून ठेवते मी 

कपाळाची टिकली गोंद 

नसल्यामुळे पडली असावी !
आई घाईघाई ठसठशीत 
कुंकवाचं बोट टेकवते 
माझ्या पायात काटा रुतला 
उतरता उतरता 
तसा तो मेंदूतही !

आईनं बदलली तेव्हा बाळाची 'सु' ची पन्ट 


माहेरपणाला आलेली प्रत्येक लेक 

हातभार चुडा,डिझायनर साड्या,
नव्या नवऱ्या......लेकुरवाळ्या !

उदबत्तीचा अख्खा पुडा 

पुढ्यात धरला आईनं 
पेटव म्हटली .... 
उदबत्तीसह घेतला पेट ..
धुराने घुसमटले पुन्हा एकदा विचार 

नैवेद्याचा खचखच 

ना देवी दिसल्यात ण म्हसोबा 
त्या दगडाजवळ एका कपात 
शेंदूर अन काडी ....!
आईनं सांगितल्याप्रमाणे 
कपातल्या काडीने शेंदूर लावला त्याला !
खालच्या थरावर प्रथेच नवं लेपन ....
पुढची आणखी काही वर्ष टिकून राहण्यासाठी ...

जवळ कित्येक कुत्री 

नैवेद्य खाताय 
त्यांनाही लावला जातोय कुंकू 
आरतींच्या वेगवेगळ्या ओळींचा नाद 
घुमतोय एकापाठोपाठ एक 

आई सावरतेय माझ्या बाळाला 

त्याच्या दुपट्यासह 
पण,मला खरोखरच काही मागायचे नव्हते !

एव्हाना नारळाचे भाव प्रचंड वधारलेत 

आसरांचे जीर्णोद्धार झालेत 
रस्त्यात काटे नाहीत तर 
कोन्क्रीटचे रस्ते आलेत
आई म्हणते, 'जत्रा भरते आता आषाढात !'

मला आजही काहीच मागायचे नाहीये 

माझ्या समोरच्या माउलीला 
मी साठवत राहते डोळ्यात 
मनाच्या प्रतलावर आभाळभर 
चिरकालीन मातृत्वाची मूर्ती
मायेचा आसरा म्हणून .....!


         - आरती बोराडे 

Sunday, April 16, 2017

बासरी

न तू मज पहिले 
न मी तुज पहिले 
गीत असे श्वासांचे 
बासरीने गायिले 

धुंद तुझ्या प्रीतीचे 
अंग अंग झुलले 
देहावर स्पर्शांचे 
शहारे हे फुलले 

वीणेच्या ह्या स्वरांना 
अलगद छेडले 
मीरेच्या ओठांनी 
मी तुलाच स्मरीले 

मनाच्या गाभाऱ्यात 
प्रेमाने बरसले
विरही श्यामली मी 
स्वत्वाचे विष प्याले 

न मी तुज पहिले 
न तू मज पहिले 
श्याम सुंदर तनुत 
एकरूप जाहले 

     - आरती बोराडे 


नायनांवर अश्रुंचे ओझे पांघरले

भेगाळल्या भुईतून श्वास मिळाल्यागत 
शब्दांनी सरसर वर चढव 
अन माझ्या अंगा-अंगाला
तुझ्या जाणीवांनी डसाव 

स्तब्ध निःशब्द सुरांनी 
गाईले मेघांचे तराणे 
अन दूर तुझ्या मनात 
पसरले शब्द चांदणे 

वेदनेचे गीत गात फिरले 
आता सवाल माझा कोरा 
का झुरावे तुझ्यास्तव मी 
तुला उरला नाही चेहरा 

दगाबाज ठरवू कशी तुला 
तुझ्या श्वासात प्राण माझे वाहिले 
मिटावे अंतरीचे अंतर 
नायनांवर अश्रुंचे ओझे पांघरले .....


              -आरती बोराडे 

Saturday, April 15, 2017

शब्दांजली .......निर्भायासाठी

घोंघावणारे वादळ
पिसाट सुटला वारा
लपेटलेल्या अंगावर
पिसाळलेल्या नजरा

रानवट लांडग्यांनी
सोडलाच नाही माग
जपावे  स्वतःस किती
अविश्वास जागोजाग

नेऊन सोडावे कुठे 
हे लक्तर स्त्री जन्माचे 
मायेच्या पान्ह्यावरही 
दंश जहरी नागाचे 

सहस्र जखमा झाल्या 
केला घात विश्वासाचा 
ओढीत,कुंठीत जीव 
मागे जोगवा जन्माचा ....


        -आरती बोराडे 

गाज

एवढी बेदरकार
श्वासात विरते 
कुशीत शिरते 
भान हरपते 
जसा बेभान चित्रकार ......

स्वर लहरी 
आसमंती दरवळते 
उरी झंकारते
तार छेडते
जसा कोकिळेचा पुकार .....

मन स्वच्छंदी 
हृदयी विराजते 
लोभस सजते 
हिरवळीस लाजवते 
तुजसाठी लाटेची गाज ....

            -आरती बोराडे 

Thursday, April 13, 2017

मी शब्दजा....

अरे छट.....
या दुनियेच्या तालावर
मी कधी नाचलेच नाही
मी पाऊल ठेवले
अन शब्द घुंगरू झाले .... !

           -- आरती बोराडे 

Thursday, April 6, 2017

आर्त किंकाळी

गर्भाच्या उबदार गाभाऱ्यात 
मला जाणवताहेत तुझे श्वास 
तुझ सुख ...
मला अनुभवण्याचं  
धडपडू लागले मी 
सारं जग जिंकण्यासाठी 
तुझ्या हातांचे कोमल स्पर्श 
डोळे मिटून कुशीत घेण्यासाठी 

स्मरणात ठेवतेस 
तू माझी प्रत्येक हालचाल
करतेस हितगुज मनीचे 
लढावेस तू पावलोपावली 
अन गाभाऱ्यात बळ मिळावे मला 
होय गं ! मी तुझी तर पडछाया 
तुझीच तर प्रतिमा !

पण आज वाटते लपावे 
आतल्या आत अन 
घ्यावेत डोळे मिटून 
हे काय होतंय मला आई  ?

थांबव ह्या वेदना
नेताय मला तुझ्यापासून दूर 
अन तुझी स्पंदन का मंदावालीत 
स्पर्श तुझे भावनारहित 
तू ही या जगासम निर्मम 
थिजल्यात भावना 
थांबतेय माझी हालचाल 
जी तू ठेवली होतीस मनात 
आता माझ्या स्मरणात 
ओटीमधला मंद अंधार 
सीझर्स ,ब्लड .....
मास्क असलेले ,नसलेले ...
ओटीबाहेर असलेले ,नसलेले अनामिक 
चेहरे !

उठतेस का तू ?
उठ ,तू बळ आहेस आत्माविश्वसाचं 
अन मी होणार आहे तुझं !
नभाची क्षितीज ओलांडून 
नेणार ना यशोशिखरावर !

नाही म्हणण्याचं बळ आहे तुझ्यात 
तुझ्या स्वर्गाला दे जीवदान 
कर मन खंबीर 
आणि हृदय मजबूत 
जन्म देण्या कोमल स्वप्नांना 
पंख देण्या पाखराला 
वेदनेतून उभारी द्यायला 

कारण .....
या वेदनेतून आर्त किंकाळी फोडत 
मला जग बघायचं 
आई ,जग बघायचंय ....!


         - आरती बोराडे 
          

अंकुर

मी तुझाच तर अंकुर
अंश मी तुझाच
नसानसांत भिनतंय
तुझ रक्त
रक्ता-मासांची तुझी
मी कूस
नको खुडूस या स्वप्नांना
रक्तपिपासू श्वापादांकरवी

नको तोडूस माझी नाळ
तुझ्या हृदयापासून
संपवून माझ्या स्पंदनाना

जे देतील साद तुझ्या वेदनेला 
'आई' म्हणून ......

            - आरती बोराडे 


Saturday, April 1, 2017

ठिपक्यांची रांगोळी


कळेना मला सुरुवात कशी करावी 
म्हणून जाणीवेच्या मुठीतूनच हळुवार
 सोडला मी अस्तित्वाचा बिंदू ....
या बिंदूभोवती गुराफटणे  जमले नाही 
कि चौकटीत राहणे मला जमले नाही ...

पूर्वी बायका नेहमीच प्राजक्ताच्या सुवासात 
उभ्या,आडव्या,तिरक्या रेखत असत स्वतःला 
आज तीच स्त्री स्वतःला मुक्तपणे 
खुलावातांना दिसते प्रोग्रामच्या विस्तीर्ण प्रतलावर 

जाणिवेचे रंग भराभर पसरत जातात 
अन माझी पावले आभाळ झेलतात 

नाही जमत मला जोखडात राहणे 
' स्व ' च्या उन्नतीला क्षमतेने मी जोडले 
म्हणूनच ठिपक्यांची रांगोळी कधी 
मला जमलीच नाही 
अन चौकटीत राहणेही ....!


          -आरती बोराडे 
मनाच्या कॅनव्हास वर दरवळे रंग 
तुझ्या मोहक सुगंधाचे 
विचारांचे कुंचले भिजताय इथे 
धुंद तुझ्या प्रीतीचे .....!!
     
         -आरती बोराडे 

जगण तुझ-माझ


दुखाःतले सुख शोधून होते कविता
तसही जगण-मरण ना तुला ठावूक ना
मला ....!
मग थोड जगुनच बघुया ....
दुखः जरा पिऊन बघुया ....
तुझ्या-माझ्या जगण्याला
कवितेचं नाव देऊन बघुया ..!

               - आरती बोराडे 

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...