खिडकीतून डोकावणारं आकाश
कवेत घेण्याची स्वप्नं
रोजच पहावीत
निश्चल समाधीस्त निवांतपणा
तुझीच साधना ती !
अंधाऱ्या खोलीच्या आत उजेडायला
एक झरोका पुरेसा
तू तर अख्खा सूर्य होऊन येतो
प्रचंड प्रखरतेत कवितेच्या कवचकुंडलांना
उजळून टाकणारा
तरिही आयुष्याच्या निम्म्या काळासाठी
गुडूप होणारा !
त्या रात्रींची चाहूल
नकोसं करते रोजच !
तशी कविता प्रसवत नाही
रोज रात्री !
एकटेपणाच स्वातंत्र्य मुक्तपणे
उधळण्याची संधीही तूच देतोस
डोळ्यांची पिसेदार पंख
आभाळभर फिरून येतात
तेव्हा खिडकीच होते
किलकिलत उघडणारे दार
येत जा गडगडाटासह
असा गर्द होऊन
ओटीत घेईन सारी सळसळ
गर्भारकविता होऊन !
-आरती

1 comment:
तुझी लेखणी प्रसवत राहू दे ...
Post a Comment