Wednesday, April 19, 2017

आई

'दर आषाढात जाव लागतं 
माहेरच्या माउल्यांना'
सांगत असते आई ...
चार महिन्याच्या बाळाचं 
डोकं ठेवून ये म्हणतेय
त्यांच्या पायावर !

सोबत म्हसोबाचा आणि 

सात माउल्यांचा नैवेद्य -----
मेथीची भाजी असलेला 
भातासह !

गावाच्या बाहेर असलेल्या किंवा 

कधी कधी पुलाच्या खाली ,
नदीवर वसतात तिथे या देवी
बारव तर कधी साती आसरा म्हणतात ज्याला !
आम्ही पण घेतो मग मुकाट्यानं
त्यांचा आसरा .....
लेकीबाळी होऊन लेकराबाळांसह 

'येता-जाता नारळ पण फोडीत जावं' 

सांगत राहते आई ....

मला काही मागायचंच नव्हत !

फक्त बाळाला घट्ट धरून ठेवते मी 

कपाळाची टिकली गोंद 

नसल्यामुळे पडली असावी !
आई घाईघाई ठसठशीत 
कुंकवाचं बोट टेकवते 
माझ्या पायात काटा रुतला 
उतरता उतरता 
तसा तो मेंदूतही !

आईनं बदलली तेव्हा बाळाची 'सु' ची पन्ट 


माहेरपणाला आलेली प्रत्येक लेक 

हातभार चुडा,डिझायनर साड्या,
नव्या नवऱ्या......लेकुरवाळ्या !

उदबत्तीचा अख्खा पुडा 

पुढ्यात धरला आईनं 
पेटव म्हटली .... 
उदबत्तीसह घेतला पेट ..
धुराने घुसमटले पुन्हा एकदा विचार 

नैवेद्याचा खचखच 

ना देवी दिसल्यात ण म्हसोबा 
त्या दगडाजवळ एका कपात 
शेंदूर अन काडी ....!
आईनं सांगितल्याप्रमाणे 
कपातल्या काडीने शेंदूर लावला त्याला !
खालच्या थरावर प्रथेच नवं लेपन ....
पुढची आणखी काही वर्ष टिकून राहण्यासाठी ...

जवळ कित्येक कुत्री 

नैवेद्य खाताय 
त्यांनाही लावला जातोय कुंकू 
आरतींच्या वेगवेगळ्या ओळींचा नाद 
घुमतोय एकापाठोपाठ एक 

आई सावरतेय माझ्या बाळाला 

त्याच्या दुपट्यासह 
पण,मला खरोखरच काही मागायचे नव्हते !

एव्हाना नारळाचे भाव प्रचंड वधारलेत 

आसरांचे जीर्णोद्धार झालेत 
रस्त्यात काटे नाहीत तर 
कोन्क्रीटचे रस्ते आलेत
आई म्हणते, 'जत्रा भरते आता आषाढात !'

मला आजही काहीच मागायचे नाहीये 

माझ्या समोरच्या माउलीला 
मी साठवत राहते डोळ्यात 
मनाच्या प्रतलावर आभाळभर 
चिरकालीन मातृत्वाची मूर्ती
मायेचा आसरा म्हणून .....!


         - आरती बोराडे 

3 comments:

Unknown said...

वास्तव मांडले

भिजलेला कॅनव्हास said...
This comment has been removed by the author.
भिजलेला कॅनव्हास said...

मुल झाल्यानंतर माहेरी जाण्याचं हे पण एक कारण असत .... आषाढात... पण आता बऱ्याच स्त्रिया नोकरी करतात, विचारपूर्वक अवलोकन करतात तेव्हा असा काहीसा अनुभव येतो... हा स्वानुभव आहे.... या अनुभवानंतर मी पुन्हा कधीही माउल्याना गेले नाही.... आई हृदयात असतांना का जावे बऱ ...???

 कुठे गेल्या या टॉपर मुली ?                             माझ्या एका मैत्रिणीचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा तिचे आणि तिच्या पतीचे कामा...